'रोहितला त्याच्या सिनेमात मला घ्यायचं होतं. कारण...'; सुचित्रा बांदेकरांनी सांगितला 'सिंघम'च्या कास्टिंगचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 12:19 PM2024-03-20T12:19:17+5:302024-03-20T12:22:06+5:30
Suchitra bandekar: सुचित्रा बांदेकर यांनी रोहितच्या सिंघम सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
'बाईपण भारी देवा', 'झिम्मा' अशा गाजलेल्या सिनेमांच्या माध्यमातून अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुचित्रा बांदेकर. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर सुचित्रा यांनी मराठी कलाविश्वावर राज्य केलं आहे. केवळ मराठीच नाही तर त्यांनी अनेक बॉलिवूडसिनेमांमध्येही त्या झळकल्या आहेत. रोहित शेट्टीच्या 'सिंघम' या सिनेमात त्यांनी सुचित्रा भोसले ही भूमिका साकारली होती. या भूमिकेविषयी अलिकडेच त्यांनी भाष्य केलं. या भूमिकेसाठी रोहित शेट्टीने त्याची निवड कशी केली हे त्यांनी सुलेखा तळवलकर यांच्या दिल के करीब या कार्यक्रमात सांगितलं.
अलिकडेच सुचित्रा बांदेकर यांनी सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के कबीर' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सिंघम सिनेमामध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला. सोबतच रोहित आणि रणवीर सिंह यांचं सेटवरचं वागणं कसं होतं हे सुद्धा सांगितलं.
सिंघमच्या वेळी एका व्यक्तीचा मला फोन आला. सुचित्रा बांदेकर आहेत का? मी रोहित शेट्टी प्रोडक्शनमधून बोलतोय. आम्हाला, तुम्हाला कास्ट करायचं आहे, असं त्यांनी फोनवर सांगितलं. त्यावर, कळते असं मी म्हटलं आणि फोन कट केला. कारण, त्यावेळी मला तो 'द रोहित शेट्टी' आहे, मोठा दिग्दर्शक वगैरे आहे असं काहीच सुचलं नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा मला फोन केला. तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचं आहे ते? असं त्यांनी विचारलं. त्यावर मी, अरे रोहित शेट्टी म्हणजे गोलमाल चित्रपट बनवणारा का? असा प्रतिप्रश्न विचारला. त्यावर समोरुन होकार दिला. आणि, मग आमचं पुढचं बोलणं सुरु झालं.
पुढे त्या सांगतात, "सरांना तुम्हाला भेटायचं आहे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी अंधेरीला त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला गेले. तिथे गेल्यावर, ‘सुचित्राजी मी ‘शिवाजीराजे भोसले बोलतोय’मध्ये तुमचं काम पाहिलंय. त्यामुळे तुम्ही ‘सिंघम’मध्ये देखील काम करावं अशी माझी इच्छा आहे,’ असं रोहितने सांगितलं. ‘सिंघम’मध्ये माझ्याबरोबर सचिन खेडेकर सुद्धा होता. ‘शिवाजीराजे भोसले बोलतोय’मधील सचिन व माझी ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहिल्यामुळे त्याला तशीच जोडी ‘सिंघम’साठी हवी होती आणि मी चित्रपटासाठी होकार दिला.”
कसा आहे रोहित शेट्टीचा स्वभाव?
"रोहित सर प्रचंड मज्जामस्ती करतात. माणसं कशी जापयची हे त्यांना चांगलंच माहितीये. आम्ही गोव्याला शूट केलं तेव्हा खूप मज्जा आली होती. ते कायम उत्साही असतात. त्यामानाने अजय देवगण खूप शांत आहे. ‘सिंघम’नंतर मी ‘सिम्बा’मध्ये काम केलं. आपला सिद्धार्थ सुद्धा त्यामध्ये होता. याशिवाय सारा अली खानशी माझी भेट झाली. ती फारच गोड मुलगी आहे. रणवीर सिंह प्रचंड प्रेमळ माणूस आहे.