Suhana Khan : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात जुनी साडी नेसून पोहोचली सुहाना खान, नेटकरी कौतुक करता थांबेना, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 14:39 IST2024-07-14T14:38:52+5:302024-07-14T14:39:35+5:30
अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्न सोहळ्यात सुहाना ही तिचा भाऊ आर्यन खानसोबत पोहचली.

Suhana Khan : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात जुनी साडी नेसून पोहोचली सुहाना खान, नेटकरी कौतुक करता थांबेना, पाहा Video
देशातले बडे उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानींचा (Anant Ambani) विवाह सोहळा मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड (GIO World) या ठिकाणी शनिवारी पार पडला. या विवाह सोहळ्यात बॉलिवूडच्या तारे तारका (Bollywood Stars) विविध राजकीय नेते, उद्योजक या सगळ्यांची उपस्थिती होती. या शाही सोहळ्यात सेलिब्रेटींनी खास डिझायन करुन घेतलेले नवे करकरीत कपडे परिधान केले. पण या सोहळ्यात बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान हिने मात्र जुनीच साडी नेसल्याचं दिसून आलं.
अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्न सोहळ्यात सुहाना ही तिचा भाऊ आर्यन खानसोबत पोहचली. सुहाना खानच्या गोल्डन साडीने सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. कारण, एवढ्या मोठ्या शाही सोहळ्यात सुहानाने एखादी नवी कोरी नाही तर तिची जुनीच साडी परिधान केली होती. ही साडी तिने याआधी 2023 च्या दिवाळीमध्ये परिधान केली होती. आता सुहाना खानच्या या साधेपणाचं चाहते कौतुक करत आहेत. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एखादा ड्रेस पुन्हा परिधान करण्याची सुहानाची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सुहानाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये तिचा एक ड्रेस रिपीट केला होता. काही दिवसांपूर्वी अंबानी कुटुंबाकडून एका भव्य प्री-वेडिंग क्रूझ पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुहाना खानने काळ्या आणि निळ्या रंगाचा फ्लोरल मिडी ड्रेस परिधान केला होता. याआधी हाच ड्रेस तिनं राहुल मिश्राच्या शोमध्ये परिधानक केला होता. 'एखाद्या पार्टीतला ड्रेस पुन्हा नक्कीच परिधान करू शकतो. नवे कपडे बनवण्यात बऱ्याच गोष्टींचा अपव्यय होतो अन् पाहायला गेलं तर ही गोष्ट पर्यावरणासाठीही फार हानिकारकच आहे', असं सुहानाचं ड्रेस रीपिट करण्याविषयी मत आहे.