"तुझी आई आपली मुलगी म्हणून जन्माला येईल...", जॅकलिनसाठी सुकेश चंद्रशेखरचं पत्र; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:58 IST2025-04-24T13:53:48+5:302025-04-24T13:58:36+5:30
"तुझी आई आपली मुलगी म्हणून जन्माला येईल...", जॅकलिनला आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुकेशने भेट दिला बाली बेटाचा मोठा भाग

"तुझी आई आपली मुलगी म्हणून जन्माला येईल...", जॅकलिनसाठी सुकेश चंद्रशेखरचं पत्र; म्हणाला...
Sukesh Chandrasekhar Letter to Jacqueline Fernandez :बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) आई किम फर्नांडिस यांचे ६ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले. अभिनेत्रीच्या आईच्या निधनाची बातमी कळताच तिचा कथित प्रियकर सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिससाठी एक पत्र पाठवले आहे. २०० कोटींच्या खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखर हा सध्या दिल्ली तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मात्र, तो तुरुंगातून सतत अभिनेत्रीसाठी पत्र पाठवत असतो. या पत्रांमुळे सुकेशचे नाव नेहमीच चर्चेत असते. आता त्याने जॅकलिनला बाली बेटाचा एक मोठा भाग भेट म्हणून दिला असून, त्यावर तिच्या आईच्या नावाने फुलांची बाग बनवल्याचे पत्रात म्हटले आहे.
२०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तुरुंगवास भोगत असलेला सुकेश चंद्रशेखर हा जॅकलिन फर्नांडिसचा कथित प्रियकर म्हणून देखील नेहमीच चर्चेत असतो. अभिनेत्रीला महागड्या भेटवस्तू देत तो सतत प्रसिद्धी झोतात येत असतो. आता त्याने अभिनेत्रीला बाली या सुंदर बेटाचा एक मोठा भाग भेट म्हणून दिला आहे. इतकंच नाही तर, या भागात असलेल्या एका लिली आणि ट्युलिपच्या बागेचे नाव किम फर्नांडिस ठेवून, त्याने जॅकलिनच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.
सुकेशने पत्रात काय लिहिले?
सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिसला पाठवलेल्या पत्रात लिहिले की, “मी बाली येथील शेतजमिनीचा एका मोठा तुकडा घेतला आहे. आता त्यावर फुलत असलेली बाग ही पूर्णपणे खाजगी आहे. ही बाग आता जॅकलिन फर्नांडिसची असून, त्यावर किम यांच्या स्मरणार्थ फुले फुलतील. आईच्या स्मरणार्थ मी आज तुला ही बाग ईस्टर भेट म्हणून देत आहे. या कठीण आणि वाईट काळात मी कायम तुझ्यासोबत आहे, याची जाणीव करून देण्यासाठी जे शक्य होईल, ते करण्याचा प्रयत्न करत आहे. तुझ्या आजूबाजूला असणारे लोक तुझ्यासोबत असल्याचं भासवतील, मात्र तो त्यांचा स्वार्थ असेल. पण, तू या सगळ्यांना पारखशील याची खात्री मला आहे.”
आई आपली मुलगी म्हणून जन्माला येईल!
सुकेशने या पत्रात जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहत लिहिले की, “आईने कधीच माझा द्वेष केला नाही. आईला नक्कीच आपल्या दोघांची मुलगी म्हणून पुनर्जन्म मिळेल. मी आज तुला जी भेट दिली आहे, ती आईसाठी समर्पित आहे. तू बाबांसोबत तिथे नक्की जा. कारण, तिथे तुला तिची उपस्थिती जाणवेल.” याशिवाय त्याने किम यांचे आवडते चर्च व्हॅटिकनमध्ये एक विशेष ईस्टर प्रार्थनासभा आयोजित करण्याचा उल्लेख देखील केला आहे.