जॅकलीन-नोरावर उडवलेले पैसे कुठून आले? सुकेश चंद्रशेखर अशी करायचा फसवणूक...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 06:45 PM2021-12-21T18:45:18+5:302021-12-21T18:45:29+5:30
200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात, ईडी सुकेश चंद्रशेखरच्या सर्व कनेक्शनची चौकशी करत आहे. या प्रकरणाचा तपास आता बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत पोहोचत आहे.
नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाची (ED) ठग सुकेश चंद्रशेखरवरील (Sukesh Chandrashekhar) कारवाई दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. विशेषत: बॉलीवूडचा अँगल समोर आल्यानंतर ईडीच्या तपासाला वेग आला आहे. सुकेश चंद्रशेखरवर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींवर करोडो रुपये उडवल्याचा आरोप आहे.
200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी सुकेश चंद्रशेखरच्या सर्व कनेक्शनची चौकशी करत आहे आणि या प्रकरणाचा तपास बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत पोहोचला आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखरने गेल्या वर्षी नोरा फतेहीला 63.94 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू कार भेट दिली होती.
नोराला दिल्या भेटवस्तू
ईडीच्या साक्षीदारांच्या यादीत नोरा फतेहीचे नाव 45व्या क्रमांकावर आहे. नोराने ईडीला सांगितले की सुकेश, त्याची एजन्सी एक्सीड एंटरेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याची पत्नी लीना पॉलने तिला एका चॅरिटी शोमध्ये डान्स करण्यासाठी चेन्नईतील एका हॉटेलमध्ये आमंत्रित केले होते. याच कार्यक्रमादरम्यान त्याने नोराला गुच्चीची बॅग आणि लीनामार्फत एक आयफोन भेट दिला होता.
सुकेश चंद्रशेखर मोठा ठग आहे
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर हा अतिशय हुशार आहे. जेव्हा त्याने पहिल्यांदा नोरा फतेहीशी फोनवर बोलले तेव्हा त्याने स्वतःला एक मोठा तिचा चाहता असल्याचे सांगून भेट म्हणून BMW कार देऊ केली. पण नोराने ती घेण्यास नकार दिली. असे असतानाही सुकेशने नोरा फतेहीला 5 सीरीजची बीएमडब्ल्यू कार पाठवली. खुद्द नोरा फतेहीने ईडीसमोर हा खुलासा केला आहे.
जॅकलिन फर्नांडिसलाही अडकवले
एका अंदाजानुसार, सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसवर सुमारे 10 कोटी रुपये खर्च केले. ज्यामध्ये बर्किन बॅग, चॅनेल आणि गुच्ची सारख्या महागड्या गिफ्ट्स देण्यात आल्या होत्या. याशिवाय कार, घोडा आणि इतर भेटवस्तूंचा समावेश आहे. इतकंच नाही तर सुकेशने जॅकलीनला 500 कोटी रुपये बजेट असलेल्या चित्रपट हिरोइन म्हणून घेणार असल्याचे सांगितले होते.
सुकेशविरोधात ईडीच्या तपासाला वेग
आता प्रश्न असा पडतो की सुकेश चंद्रशेखरकडे एवढे पैसे आले कुठून? ईडीच्या तपासानुसार सुकेश चंद्रशेखर हा सुद्धा एक चपळ ठग आहे. तो कष्टाने कमावलेला पैसा वाया घालवत नव्हता. फसवणुकीतून कमावलेले पेसे तो उडवायचा. सुकेश चंद्रशेखर 2017 पासून तुरुंगात आहे, मात्र तुरुंगातूनच त्याने अनेकांची फसवणूक केली. तपासात सुकेशचे अनेक दावे खोटे असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. त्याचे उत्पन्नाचे स्त्रोत फसवणुकीच्या रुपाने समोर आले आहेत.
सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप
तिहार तुरुंगात असताना, सुकेश चंद्रशेखरने रॅनबॅक्सीचे मालक शिविंदर सिंग यांची पत्नी अदिती सिंग हिला आपल्या जाळ्यात अडकवले होते. सुकेशने तिला आश्वासन दिले की, तो गृह मंत्रालयाचा वरिष्ठ अधिकारी आहे आणि तिच्या पतीला जामीन मिळवून देईल. अदिती सिंगलाही त्यांचे म्हणणे पटले आणि तिले त्याला 200 कोटींचे पेमेंट केले. पण काही महिन्यांनंतर आदिती सिंगला सुकेश ठग असल्याचे समजले. आता ईडी याच सर्व प्रकरणांचा तपास करत आहे. चौकशीत त्याने आणखी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे घेतली असून, येत्या काही दिवसांत मनी लाँड्रिंगचे हे प्रकरण वाढू शकते.