अनेक वर्षांपासून अंथरूणाला खिळून आहे ही अभिनेत्री, संजीव कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने केले नाही लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 09:00 PM2019-05-19T21:00:00+5:302019-05-19T21:00:02+5:30
संजीव कुमार आणि या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
हेरा फेरी, अपनापन, खानदान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला सुलक्षणा पंडीत या अभिनेत्रीला पाहायला मिळाले होते. सुलक्षणा यांच्या सौंदर्याची त्याकाळी चांगलीच चर्चा होती. पण असे असूनही त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. त्यांनी लग्न न करण्यामागे एक कारण आहे.
सुलक्षणा या चांगल्या अभिनेत्री असण्यासोबतच खूपच चांगल्या गायिका देखील होत्या. त्यांनी किशोर कुमार, मोहम्मद रफी या त्या काळच्या आघाडीच्या गायकांसोबत गाणी गायली आहेत. प्रसिद्ध संगीतकार जतीन-ललित हे त्यांचे भाऊ असून अभिनेत्री विजेता पंडीत ही त्यांची बहीण आहे.
सुलक्षणा पंडित यांनी अधिकाधिक चित्रपटांमध्ये संजीव कुमार यांच्यासोबतच काम केले. संजीव कुमार आज हयात नाहीत. पण एकेकाळी सुलक्षणा पंडित त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या. संजीव कुमार यांनी नकार दिल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले. ही गोष्ट सुलक्षणा यांची बहीण विजेता पंडित यांनीच स्वतः मीडियाला सांगितली होती.
सुलक्षणा अनेक वर्षांपासून बिछान्याला खिळलेल्या असून त्या विजेतासोबतच राहातात. विजेता यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, सुलक्षणा दीदी दिवसातील अनेक तास तिच्या रूमममध्येच घालवते. संजीव कुमार यांनी प्रेमाचा स्वीकार न केल्याने तिचे संपूर्ण आयुष्यच बदलले आणि त्यात संजीव कुमार यांचा अतिशय कमी वयात मृत्यू झाल्याने तिचे मानसिक संतुलन अधिकच बिघडले. संजीव कुमार यांचा मृत्यू झाल्यानंतर काही वर्षं दीदी एकटीच राहात होती. पण तिची तब्येत अधिक ढासळल्याने मी तिला घरी घेऊन आले. तेव्हापासून ती माझ्यासोबतच राहात आहे. काही वर्षांपूर्वी ती बाथरूममध्ये पडली होती आणि त्यामुळे तिच्या कंबरेला जबर मार बसला होता. तेव्हापासून तिला धड चालता देखील येत नाही. ती अथंरुणालाच खिळून आहे. तिला कोणालाही भेटायला आवडत नाही. तसेच ती कोणाशी जास्त बोलतदेखील नाही.
संजीव कुमार आणि सुलक्षणा पंडित यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. उलझन या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी सुलक्षणा संजीव कुमार यांच्या प्रेमात पडल्या. पण संजीव कुमार यांना हेमा मालिनी आवडत असल्याने त्यांनी सुलक्षणा यांना नकार दिला.