OMG!हेरा फेरीच्या सेटवर सुनील शेट्टी आणि अक्षय कुमारवर आली होती पेपरवर झोपायची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 08:00 AM2020-04-12T08:00:00+5:302020-04-12T08:00:02+5:30
सुनील शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक भन्नाट किस्से सांगितले आहेत.
हेरा फेरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या तिकडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. या चित्रपटातील तिघांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटातील अनेक संवाद तर आजही प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. हेरा फेरी या चित्रपटाला नुकतेच २० वर्षं पूर्ण झाले असून या निमित्ताने सुनील शेट्टीने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक भन्नाट किस्से सांगितले आहेत.
सुनीलने आयएमडीबीएला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तुम्हाला विश्वास बसणार नाही... पण चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मिळत असलेल्या ब्रेकमध्ये मला, अक्षय आणि परेश रावल यांना वर्तमानपत्रावर झोपावे लागत असे. या चित्रपटाचे चित्रीकरण करणे हा एक वेगळाच अनुभव आमच्या तिघांसाठी देखील होता. आम्ही तिघे सकाळी सेटवर आल्यानंतर कॉश्च्युम पाहून आम्हाला शॉक बसायचा... कारण आमच्या कपड्यांना कधीच इस्त्री केलेली नसायची. कपडे अतिशय वाईट स्थितीत असायचे. दुपारी आम्हाला काही वेळेचा ब्रेक मिळायचा. पण या ब्रेकमध्ये आमचे दिग्दर्शक प्रियदर्शन आम्हाला वर्तमानपत्रावर झोपायला लावायचे. चित्रीकरणादरम्यान आम्ही तिघांनी आराम केला पाहिजे... पण आम्हाला कोणत्याही प्रकारचा कर्म्फट मिळता कामा नये असे त्यांचे म्हणणे होते.
सुनीलने पुढे सांगितले, या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान आमच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा मेकअप देखील केला जायचा नाही. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मी, अक्षय आणि परेश रावल आम्ही तिघेही सतत एकत्र असायचो. प्रत्येक संवादाची आम्ही अनेकवेळा तालीम करायचो.
हेरा फेरी या चित्रपटात अक्षय, परेश आणि सुनीलसोबतच तब्बू, असरानी, कुलभुषण खरबंदा, गुलशन ग्रोव्हर, ओम पुरी हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत होते. हेरा फेरी या चित्रपटाच्या यशानंतर अक्षय, परेश आणि सुनील या तिकडीला घेऊन निर्मात्यांनी फिर हेरा फेरी हा हेरी फेरीचा दुसरा भाग बनवला होता. हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.