'बॉयकॉट बॉलिवूड' ट्रेंडवर अभिनेता सुनील शेट्टीचं मोठं विधान, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 05:34 PM2023-12-14T17:34:03+5:302023-12-14T17:36:21+5:30
नुकतेच एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीने 'बॉयकॉट बॉलिवूड' ट्रेंडवर भाष्य केलं.
बॉलिवूडचा अण्णा म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी. सुनीलने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. उत्कृष्ट अभिनय आणि स्टंटबाजीच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीमध्ये आपलं भक्कम स्थान निर्माण केले. सुनील शेट्टी हा कायमच चर्चेत असतो. नुकतेच एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीने 'बॉयकॉट बॉलिवूड' ट्रेंडवर भाष्य केलं.
वर्ष 2022 मध्ये सोशल मीडियावर 'बॉयकॉट बॉलिवूड' ट्रेंड सुरू झाला होता. 'ब्रह्मास्त्र', 'लाल सिंग चड्ढा' सारख्या बिग बजेट चित्रपटांच्या रिलीज दरम्यान हा ट्रेंड चालू होता. त्यामुळे अनेक चित्रपटांचे मोठे नुकसान झाले. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सुनील म्हणाला, 'मला वाटते की तो फक्त एक टप्पा होता, एक ट्रेंड सुरू झाला आणि संपला. #BoycottBollywood' हा एक व्हायरल ट्रेंड होता. ज्यामुळे तेव्हा बरेच नुकसान झाले'.
योगी आदित्यनाथ यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण करून देताना तो म्हणाला, 'जेव्हा मी योगी यांच्याशी बोललो. तेव्हा मी प्रामाणिक होतो. मी त्याला पहिली गोष्ट म्हणालो होतो की, लोक तर देवालाही दोष देतात. आपण तर फक्त माणसं आहोत. माझे हे वाक्य त्यांनी खूप सकारात्मकतेने घेतले होते'.
सुनील पुढे म्हणाला, 'हे सगळे ट्रोलर्स आता कुठे आहेत? आता ते हॅशटॅग अस्तित्वात आहेत का? थोडेफार असतीलही. सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड पोस्ट करण्यात काही अर्थ नाही. जेव्हा तो व्हायरल ट्रेंड होतो, तेव्हाही त्याला काही अर्थ नव्हता. मला असे वाटते की तो एक वाईट काळ होता. ज्यातून आम्ही सगळे बाहेर आले आहोत'.
सुनील शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो दिग्दर्शक स्वरूप राज मेदाराच्या आगामी 'उड जा नन्हे दिल'मध्ये गौरव कांबळे आणि सुरेंद्र पाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय तो 'कोड एआय' या आगामी चित्रपटातही दिसणार आहे. सुनीलकडे 'हेरा फेरी 3', 'आवारा पागल दिवाना 2', 'वेलकम टू द जंगल' यांसह अनेक उत्कृष्ट चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.