सुनील शेट्टीला स्वत:चेच काही सिनेमे बघून येतो राग तेव्हा... !!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 12:02 PM2021-08-19T12:02:11+5:302021-08-19T12:02:35+5:30
Suniel Shetty : करिअरच्या सुरुवातीला आपल्या हातून काही चुका झाल्या आहेत, याची जाणीव सुनील शेट्टीला खूप आधीच झाली होती....
बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीने (Suniel Shetty) 90 च्या दशकात अॅक्शन हिरो म्हणून स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली होती. ‘बलवान’ या त्याच्या पहिल्याच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आणि अण्णा अॅक्शन हिरो म्हणून लोकप्रिय झाला. मोहरा, दिलवाले, गोपी किशन, बॉर्डर असे शानदार सिनेमे त्याने दिले. पण कालांतराने लोकप्रियतेला ओहोटी लागली आणि अण्णा विचारात पडला. अगदी यासाठी त्याने अॅक्शन हिरोच्या इमेजमधून बाहेर येत कॉमेडी सिनेमेही निवडले. करिअरच्या सुरुवातीला आपल्या हातून काही चुका झाल्या आहेत, याची जाणीव सुनील शेट्टीला खूप आधीच झाली होती.
20 वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टी यावर बोलला होता. ‘इंडस्ट्रीत मला खूप काही शिकायला मिळाले. पण सुरूवातीचे माझे काही सिनेमे बघतो तेव्हा ते मिटवून टाकावेत आणि नव्याने बनवावेत, असे मला राहून राहून वाटतं. अर्थात तेव्हा मी इंडस्ट्रीत अगदी रांगत्या बाळासारखा होतो. मी आधी रांगायला शिकलो, मग बसायला शिकलो आणि मग उभा झालो. लवकरच पळायला लागेल, अशी आशा आहे, ’असे सुनील या मुलाखतीत म्हणाला होता.
पुढे तो म्हणाला होता की,‘माझ्याकडे चांगले वाईट दोन्ही अनुभव आहेत. हेच अनुभव तुम्हाला घडवतं असतात. माझ्याकडे विनोदाचे अंग आहे, म्हणून मला कॉमेडी सिनेमे करायचे आहेत. अर्थात मार्शल आर्टचे ट्रेनिंग घेतले असल्यामुळे मला बहुतांश अॅक्शन रोल मिळतात. एकदा या रोलमध्ये तुम्ही यशस्वी झालात की, तसेच रोल ऑफर केले जातात.’
तुम्हाला ठाऊक असेलच की, अक्षय कुमार व सुनील शेट्टीने जवळजवळ एकत्रच करिअर सुरू केले होते. अक्षय कुमार आज सुपरस्टार आहे. याऊलट सुनील शेट्टीच्या झोळी तशी रिकामीच आहे.