Suniel Shetty : सुनील शेट्टीच्या फिटनेस मागचं रहस्य काय? म्हणाला, "जिम अन् योगाशिवाय मी...."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 10:22 AM2023-06-08T10:22:04+5:302023-06-08T10:23:08+5:30
बॉलिवूडचा अण्णा सुनील शेट्टी ६१ व्या वर्षीही इतका फिट कसा माहितीये?
बॉलिवूडचा अण्णा सुनील शेट्टी (Suniel Shetty) ६१ व्या वर्षीही इतका फिट कसा असा प्रश्न अनेकांना पडतो. बॉलिवूडच्या सर्वात फिट अभिनेत्यांमध्ये त्याची गणना होते. सेलिब्रिटीच काय तर सामान्य लोकही त्याच्याकडून प्रेरणा घेतात. तो नक्की कोणतं रुटीन फॉलो करतो, काय डाएट करतो याचं सीक्रेट त्याने नुकतंच एका व्हिडिओतून उघड केलं आहे.
सुनील शेट्टीने लिंक्डइनवरील व्हिडिओत त्याच्या फिटनेसचा राज सांगितला आहे. तो अनेकदा चाहत्यांसोबत मोटिव्हेशनल व्हिडिओ शेअर करत असतो. आताही त्याने एक स्वत:च्याच फिटनेसचा प्रवास व्हिडिओमधून सांगितला आहे. तो म्हणाला, "मी रोज सकाळी ५ वाजता उठतो. कामावर जायच्या आधी स्वत:ला ४ ते ५ तासांचा वेळ देतो जो गरजेचा आहे. ५ वाजता उठून आधी अंघोळ आणि मग जिम ला जातो. योगा आणि ब्रिदिंग एक्सरसाईज करतो. यावेळी मी मोबाईल पूर्णपणे दूर ठेवतो. यानंतर आई, पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवतो."
तो पुढे म्हणाला, "आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने मी फिट असतो. यामुळेच मी रुटीन फॉलो करु शकतो आणि सगळी कामं वेळेत पूर्ण करु शकतो. दिवसाची सुरुवात लवकर केली तर तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकता. हे मी गेल्या कित्येक वर्षांपासून फॉलो करत आहे आणि याचाच मला फायदाही होत आहे."
सुनील शेट्टीच्या प्रोफेशनल आयुष्याविषयी सांगायचं तर तो नुकताच 'हंटर' वेब सीरीजमध्ये दिसला. लवकरच त्याचा 'ऑपरेशन फ्रायडे' आणि 'हेरा फेरी' हे चित्रपट येणार आहेत.