३ वर्षांनंतर सुनील शेट्टीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक, 'केसरी वीर'मध्ये दिसला दमदार लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:04 IST2025-02-18T18:03:38+5:302025-02-18T18:04:22+5:30
Kesari Veer: Legends of Somnath Movie : सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि सूरज पंचोली अभिनीत 'केसरी वीर: लिजेंड्स ऑफ सोमनाथ'चा टीझर प्रदर्शित झाला आहे.

३ वर्षांनंतर सुनील शेट्टीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक, 'केसरी वीर'मध्ये दिसला दमदार लूक
सुनील शेट्टी (Suniel Shetty), विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) आणि सूरज पंचोली (Suraj Pancholi) अभिनीत 'केसरी वीर: लिजेंड्स ऑफ सोमनाथ'(Kesari Veer: Legends of Somnath Movie)चा टीझर प्रदर्शित झाला आहे, जो दमदार अॅक्शन आणि हाय-ऑक्टेन सीक्वेन्सने भरलेला आहे. या सिनेमात १४ व्या शतकात प्रसिद्ध सोमनाथ मंदिराचे आक्रमणकर्त्यांपासून रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर योद्ध्यांची कहाणी पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये अनेक रोमांचक क्षण आहेत, परंतु सर्वात खास गोष्ट म्हणजे सुनील शेट्टी तीन वर्षांनी 'केसरी वीर: लिजेंड्स ऑफ सोमनाथ' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर जोरदार पुनरागमन करत आहे. तो शेवटचा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'घानी' चित्रपटात दिसला होता आणि आता तो त्याच्या चाहत्यांना एका ऐतिहासिक थ्रिलर आणि साहसी प्रवासावर घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे.
'केसरी वीर: लिजेंड्स ऑफ सोमनाथ' चित्रपटात वेगडाची भूमिका करणारा सुनील शेट्टी टीझरमध्ये एका दमदार अॅक्शन सीनमध्ये दिसत आहे. त्याचा दमदार आणि प्रभावी अभिनय कथेत जिवंतपणा आणतो. सोमनाथ मंदिराच्या रक्षणासाठी लढलेल्या ऐतिहासिक लढाईत त्याचे पात्र महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. सुनील शेट्टीने त्याच्या दशकांच्या कारकिर्दीत सातत्याने एक उत्तम कलाकार म्हणून स्वतःला विकसित केले आहे आणि 'केसरी वीर: लिजेंड्स ऑफ सोमनाथ'मधील त्याची भूमिका पुन्हा एकदा त्याची बहुमुखी प्रतिभा प्रेक्षकांसमोर आणण्याचे आश्वासन देते. या चित्रपटात सुनील शेट्टी आणि सूरज पंचोली मुख्य भूमिकेत आहेत, तर विवेक ओबेरॉय जफर नावाच्या खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
या पीरियड ड्रामामधून आकांक्षा शर्मा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ती सूरज पांचोलीसोबत एक रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. प्रिन्स धीमान दिग्दर्शित आणि चौहान स्टुडिओज अंतर्गत कानू चौहान निर्मित, 'केसरी वीर: लिजेंड्स ऑफ सोमनाथ' हा एक भव्य सिनेमॅटिक अनुभव असणार आहे. हा चित्रपट भारतभरात अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल आणि १४ मार्च २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.