1 निर्णयामुळे सुनील दत्त झाला होते कर्जबाजारी, गाड्या विकल्या, राहतं घरही ठेवावं लागलं होतं गहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 12:04 PM2023-06-06T12:04:19+5:302023-06-06T12:24:17+5:30
अशी एक घटना घडली ज्यामुळे सुनील दत्त यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली होती. लोकांनी त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली.
अभिनेते सुनील दत्त (Sunil Dutt) उर्फ बलराज दत्त आज आपल्यात नाहीत. पण एक उत्तम कलाकार, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून ते कायम लोकांच्या मनात जिवंत असतील. आज (6 जून) सुनील दत्त यांचा वाढदिवस आहे. (Sunil Dutt Birth Anniversary )
6 जून 1929 रोजी त्याकाळी भारतात असलेल्या पाकिस्तानमधील झेलम येथे सुनील दत्त यांचा जन्म झाला. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगत असताना वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्यावरुन वडीलांचे छत्र हरपले. ते अठरा वर्षांचे असताना भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान उठलेल्या दंगलीतून याकूब नावाच्या मुस्लिम तरुणाने सुनील आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्राण वाचवले होते.
फाळणीनंतर सुनील दत्त कुटुंबीयांबरोबर हरियाणाच्या यमुना नगर स्थित मंडोली गावात स्थायिक झाले. त्यानंतरचा काही काळ त्यांनी लखनौमध्ये घालवला. येथून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना त्यांनी काही काळ मुंबईतील ‘बेस्ट’ या लोकल बसमध्ये नोकरी केली. यादरम्यान सिलोन रेडिओमध्ये आरजेची नोकरी करत असताना त्यांच्या फिल्मी करिअरलाही सुरुवात झाली.
आपल्या अभिनय कारकिर्दीत यशस्वी झाल्यानंतर सुनील दत्त यांनी चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली, परंतु त्याचदरम्यान अशी एक घटना घडली ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनील दत्त 'रेश्मा और शेरा' चित्रपटाची निर्मिती करत होते आणि त्यात ते स्वतःही मुख्य भूमिकेत होते. सुखदेव या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते, पण सुनील दत्त यांना सुखदेवचे दिग्दर्शन आवडले नाही आणि त्यांनी स्वत: चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. सुखदेव यांच्या दिग्दर्शनाखाली या चित्रपटाचे शूटिंग मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले होते, परंतु सुनील दत्त यांनी ते पुन्हा शूट करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांच्यावर 60 लाख रुपयांचे कर्ज होते.
हा चित्रपट फ्लॉप झाल्याने कर्जबाजारी सुनील दत्त यांना आणखी एक धक्का बसला. चित्रपट फ्लॉप होताच लोकांनी त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. याबद्दल बोलताना सुनील दत्त यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मी त्यावेळी दिवाळखोर झालो होतो. मला माझ्या गाड्या विकाव्या लागल्या. मी बसमध्ये प्रवास करू लागलो. माझ्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी मी एक कार भाड्याने घेतली. माझं घरही गहाण ठेवलं होते. मात्र, सुनील दत्त या कठीण प्रसंगातूनही बाहेर आले आणि त्यांची आर्थिक स्थिती पुन्हा सावरली.