सुनील शेट्टीच्या शॉर्ट फिल्म स्पर्धेत जिंकल्यास मिळू शकते अभिनयाची संधी, अशाप्रकारे पाठवा शॉर्टफिल्म
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 05:26 PM2020-04-23T17:26:55+5:302020-04-23T17:27:55+5:30
सुनील शेट्टीने लोकांना घरातच राहून लोकांना शॉर्ट फिल्मस बनवायला सांगितल्या आहेत. ही शॉर्टफिल्म आवडल्यास लोकांना अभिनय, दिग्दर्शन करण्याची संधी तो देणार आहे.
सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे काहीही महत्त्वाचे कारण असेल तरच लोकांनी घराच्या बाहेर पडावे असे सगळ्यांना सरकारने सांगितले आहे. लोकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन सेलिब्रेटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. आता यात अभिनेता सुनील शेट्टीने एक खास गोष्ट लोकांसाठी केली आहे. त्याच्या या गोष्टीचे सगळीकडेच कौतुक केले जात आहे. सुनील शेट्टीने लोकांना घरातच राहून लोकांना शॉर्ट फिल्मस बनवायला सांगितल्या आहेत आणि त्यासाठी लोकांना बक्षिसं देखील मिळणार आहेत.
सुनील शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे तो त्याच्या फॅन्सना सांगत आहे की, एफटीसी टॅलेंट मीडिया अँड एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड लोकांना आवाहन करत आहे की, तुम्ही आमच्या शॉर्ट फिल्म बनवण्याच्या स्पर्धेत भाग घ्या... तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर शॉर्ट फिल्म शूट करा आणि www.ftctalent.com या वेबसाईटवर अपलोड करा... या स्पर्धेतील तुमची शॉर्ट फिल्म आवडल्यास तुम्हाला अभिनय करण्याची, दिग्दर्शक बनण्याची संधी मिळू शकते. याशिवाय खूप सारी बक्षिसं देखील तुम्ही मिळवू शकता. केवळ आमची एकच अट आहे की, हा व्हिडिओ घरातच बनवलेला पाहिजे.... घराच्या बाहेर जाऊन नव्हे....
सुनील शेट्टीने आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे अनेकांना आपले टॅलेंट दाखवण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेमुळे लोकांना बक्षिसं मिळण्यासोबतच इंडस्ट्रीत काम करण्याची संधी देखील मिळणार आहे. ही शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी घरातील लोकांची तुम्ही मदत घेऊ शकता... तसेच ही स्पर्धा विनामूल्य असून केवळ www.ftctalent.com या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लॉगिन करायचे आहे आणि तुमचे नाव रजिस्टर करून तुमची शॉर्ट फिल्म पाठवायची आहे.