सुनील शेट्टी सांगतोय, पत्नीच नव्हे तर या स्त्रियांचा आहे माझ्या यशामागे मोलाचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 06:00 AM2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:02+5:30
सुनील शेट्टीने लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी गप्पा मारल्या.
सुनील शेट्टी पहलवान या चित्रपटाद्वारे चार वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत कमबॅक करत आहे. त्याच्या या कमबॅकविषयी आणि एकंदरीत त्याच्या करियरबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...
तुझे फॅन्स तुला गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच मिस करत आहेस... चित्रपटांपासून दूर राहाण्यामागे काही खास कारण होते का?
मी काही ठरवून चित्रपटातून ब्रेक घेतला नव्हता. माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे मी काम करत नव्हतो. पण चार वर्षांनंतर देखील मला फॅनचे तितकेच प्रेम मिळत आहे. आजही लोक मला विसरले नाहीत याचा मला प्रचंड आनंद होत आहे.
पहलवान या चित्रपटाद्वारेच कमबॅक करण्याचे का ठरवले?
हा चित्रपट हिंदीसोबतच प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मी या चित्रपटात काम करण्याचा विचार केला आणि त्यातही या चित्रपटाचा विषय चांगला असून रेसलिंग, बॉक्सिंग ॲक्शन या माझ्या अतिशय आवडत्या विषयांशी निगडित या चित्रपटाची कथा आहे. खरे तर या चित्रपटाविषयी मला विचारले त्यावेळी या चित्रपटात मी काम करू की नको या संभ्रमात होतो. पण या चित्रपटातील मुख्य कलाकार खिचा (सुदीप) हा माझा खूप चांगला मित्र आहे. त्याने मला फोन केल्यामुळेच मी या चित्रपटात काम करण्यास होकार दिला.
प्रादेशिक भाषेत काम करण्याच्या अनुभवाविषयी काय सांगशील?
अनेक लोकांना दाक्षिणात्य भाषा म्हटल्या की, सगळ्या भाषा या सारख्याच आहेत. पण सगळ्याच भाषा एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. मी लहानपणापासून तूलू बोलतो. ही माझी मातृभाषा आहे. पण या चित्रपटात मला कन्नडमध्ये संवाद म्हणायचे होते. ते माझ्यासाठी खूपच कठीण होते. सेटवर माझे उच्चार, बोलण्याची ढब चुकत नाहीयेत ना... हे पाहाण्यासाठी एक खास व्यक्ती असायचा. या चित्रपटात मला सगळ्यात जास्त भाषेवर मेहनत घ्यावी लागली.
प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो, असे म्हटले जाते... तुझ्याबाबतीत ते कितपत खरे आहे?
मला आजवर मिळालेल्या यशामागे केवळ एक स्त्री आहे असे मी कधीच म्हणणार नाही. माझ्या या यशामागे पाच स्त्रिया असून त्यांच्यामुळे मी यश मिळवू शकलो. माझ्या आईने लहानपणापासून मी मोठा होईपर्यंत अक्षरशः हात पकडून मला प्रत्येक गोष्ट शिकवली. माझ्या बहिणी नेहमीच प्रत्येक परिस्थितीत माझ्या पाठिशी उभ्या असतात. माझ्या बायकोने मला आयुष्यात नेहमीच साथ दिली. माझे चित्रपट चालले नाहीत, तरी ती मला काम करायला प्रोत्साहन द्यायची. मुलीच्या जन्मानंतर तर आयुष्यातील अनेक गोष्टी बदलल्या. आज मला सत्य-असत्यमधील फरक सांगणारी केवळ तीच आहे. या सगळ्या स्त्रियांचा माझ्या यशामागेच नव्हे तर माझ्या खूश असण्यामागे हात आहे. प्रत्येक यशस्वी नव्हे तर आनंदी व्यक्तीच्यामागे महिलांचा हात असतो असे मला तरी वाटते.
तुझ्या फिटनेसचे नेहमीच कौतुक केले जाते, तुझ्या फिटनेसचे रहस्य काय आहे?
मी न चुकता रोज सकाळी लवकर उठतो आणि सहा वाजता योगा करतो. मी माझ्या कामात कितीही व्यग्र असलो तरी संध्याकाळी मी जीममध्ये जातो. मी कधीही जीममध्ये गेल्याशिवाय घरी परतत नाही. मी माझ्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतो.