सनी देओलने कन्फर्म केली 'रामायण'मधील भूमिका; म्हणाला, " हा 'अवतार' सिनेमासारखाच..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 10:51 AM2024-12-10T10:51:09+5:302024-12-10T10:51:32+5:30
याआधी 'रामायण' आधारित काही सिनेमांवर टीका झाली. त्यावर सनी म्हणाला...
दिग्दर्शक नितेश तिवारी 'रामायण' (Ramayan) सिनेमा घेऊन येत आहेत हे आता सगळ्यांनाच माहित आहे. 'आदिपुरुष' नंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा 'रामायण' बनत आहे. ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' वर तर प्रचंड टीका झाली. त्यामुळे आता नितेश तिवारींची जबाबदारी जास्तच वाढली आहे. त्यांना कोणाच्याही भावना दुखावून चालणार नाही. रणबीर कपूरने नुकतंच सिनेमात श्रीरामाची भूमिका करत असल्याचं कन्फर्म केलं. तर आता सनी देओलनेही (Sunny Deol) हनुमानाच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
'रामायण' मध्ये हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सनी देओल म्हणाला, "रामायण हा एक मोठा प्रोजेक्ट आहे. 'अवतार' आणि 'प्लॅनेट ऑफ द एप्स' सिनेमांप्रमाणेच मोठ्या स्केलवर रामायण बनवण्याचा मेकर्सचा प्रयत्न आहे. ते सर्व टेक्निशियन याचा भाग आहेत. सिनेमा कसा असणार आणि प्रत्येक भूमिका तशी सादर केली जाणार याबाबतीत लेखक आणि दिग्दर्शक अगदी स्पष्ट आहेत."
याआधी 'रामायण'वरील काही सिनेमांवर टीकाही झाली. यावर सनी म्हणाला, "तुम्हाला सिनेमा स्पेशल इफेट्सही बघायला मिळतील. या घटना खरोखरंच घडल्या आहेत असाच भास होईल. प्रामाणिकपणे सांगायचं तर मला खात्री आहे की हा सिनेमा खूप चांगला होणार आहे आणि नक्कीच प्रत्येकाला सिनेमा आवडेल."
'रामायण'च्या पहिल्या पार्टचं शूट पूर्ण झालं आहे अशी माहिती नुकतीच रणबीर कपूरने दिली होती. त्याच्यासोबत साई पल्लवी सीतामातेच्या भूमिकेत आहे. 'केजीएफ' फेम यश रावणाची भूमिका साकारत आहे. २०२५ मध्ये 'रामायण'चा पहिला भाग आणि २०२६ मध्ये दुसरा भाग रिलीज होणार आहे.