Chup Movie Review : दुलकर सलमान व सनी देओलचा ‘चुप’ रिलीज, पाहायला जाण्याआधी वाचा रिव्ह्यू

By संजय घावरे | Published: September 23, 2022 05:01 PM2022-09-23T17:01:11+5:302022-09-23T17:09:15+5:30

 Chup Movie Review in Marathi : ‘कागज के फूल बनाने वाले को कागज पर कलम चलाने वालों ने चुप करा दिया था’ असं म्हणत आर. बाल्कींनी या चित्रपटाद्वारे गुरुदत्त यांना अनोख्या शैलीत ट्रिब्युट देण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचं सारही याच डायलॉग्जमध्ये दडलेलं आहे.

Sunny Deol, Dulquer Salmaan Chup movie review IN marathi BOLLYWOOD | Chup Movie Review : दुलकर सलमान व सनी देओलचा ‘चुप’ रिलीज, पाहायला जाण्याआधी वाचा रिव्ह्यू

Chup Movie Review : दुलकर सलमान व सनी देओलचा ‘चुप’ रिलीज, पाहायला जाण्याआधी वाचा रिव्ह्यू

googlenewsNext

 दर्जा: ***

...............................................

कलाकार :दुलकर सलमान, श्रेया धन्वंतरी, सनी देओल, पूजा भट्ट, सरन्या पोनवन्नन,  प्राजक्ता परब 
दिग्दर्शक : आर. बाल्की
निर्माते : राकेश झुनझुनवाला, जयंतीलाल गडा, अनिल नायडू, गौरी शिंदे
शैली : सायकोलॉजिकल क्राईम थ्रिलर
कालावधी : 4 तास 15 मिनिटे
..............................

 Chup Movie Review in Marathi : ‘कागज के फूल बनाने वाले को कागज पर कलम चलाने वालों ने चुप करा दिया था’ असं म्हणत आर. बाल्कींनी या चित्रपटाद्वारे गुरुदत्त यांना अनोख्या शैलीत ट्रिब्युट देण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचं सारही याच डायलॉग्जमध्ये दडलेलं आहे. कलाकारांचा कसदार अभिनय, ब्लॅक अँड व्हाईटच्या काळातील गाजलेल्या गाण्यांचं पार्श्वसंगीत आणि नेहमीपेक्षा वेगळी असलेली पटकथेची बांधणी हे या चित्रपटाचं प्रमुख आकर्षण आहे

कथानक : वर्तमानपत्रामध्ये सिनेमांचे रिव्ह्यू लिहिणाऱ्या समीक्षकाची निर्घृण हत्या होते. त्याच्या तपासाची सूत्रं अरविंद माथूरकडे (सनी देओल) सोपवली जातात. याच जोडीला डॅनीज फ्लॉवरच्या मालकाची (दुलकर सलमान) हळूवार प्रेमकथा सुरू होते. एन्टरटेन्मेंट जर्नलिस्ट असलेल्या नीला (श्रेया धन्वंतरी) डॅनीच्या दुकानात फुलं खरेदी करण्यासाठी येते. दोघांचे सूर जुळतात आणि प्रेमकथेच्या कळ्या उमलू लागतात. दुसऱ्या बाजूला एका मागोमाग एक समीक्षकांच्या हत्या सुरूच असतात. चार समीक्षकांच्या हत्या होऊनही पोलिस सिरियल किलरपर्यंत पोहोचू शकलेले नसतात. शोध घेण्यासाठी सायकोलॉजिस्ट जेनेबियाची (पूजा भट्ट) एंट्री होते. त्यानंतर काय घडतं ते चित्रपटात पहायला मिळतं

लेखन-दिग्दर्शन : सिरीयल किलरचा विषय आजवर कधीही न पाहिलेल्या शैलीत मांडला आहे. समीक्षकांच्या हत्या हा थॉट नावीन्यपूर्ण आहे. याद्वारे एक विचार मांडला आहे. समीक्षक जे लिहितात त्यामुळं एखाद्या उदयोन्मुख कलाकाराचं, तंत्रज्ञाचं, दिग्दर्शकाचं करियर धुळीस मिळू शकतं याची जाणीव करून देण्याचाही हा प्रयत्न आहे. याच जोडीला टुकार सिनेमाचे गोडवे गाणाऱ्यांनाही शालजोडीतले स्टार देण्यात आले आहेत. या चित्रपटातील सिरियल किलरचं गणित क्रिटिक्सनं दिलेल्या स्टार्सवर अवलंबून असतं. किलर हत्या का करतो त्याचं रहस्य अखेरपर्यंत उलगडू दिलेलं नाही. पोलिसांनी पकडल्यानंतर किलरद्वारे हत्यांचा उलगडा केला जाणं, क्लायमॅक्समध्ये पोलिसांनी किलरचा पाठलाग करणं, पोलिसांना खेळवणारा किलर असं काही यात नाही, पण त्यामुळे किलर कोण आहे हे सहज लक्षात येतं. शेवटची हत्या करण्याचा प्रयत्न करणारा किलर एका बिल्डींगमधून थेट दुसऱ्या बिल्डींगच्या आवारात बॉडी फेकतो हे न पटण्याजोगं वाटतं. गुरुदत्त यांची आठवण वेळोवेळी होते, मध्यंतरापूर्वीचा भाग रहस्यमय वाटतो. मध्यंतरानंतर कथा थोडी खेचल्यासारखी वाटते. जुन्या गाण्यांचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. चित्रपटाला सुरुवातीपासून एक वेगळाच कलरटोन आहे. कॅमेरावर्क सुरेख आहे.

अभिनय : स्वत:शीच बडबडणाऱ्या फ्लोरिस्टची भूमिका दुलकर सलमाननं खूप सुरेख केली आहे. श्रेया धन्वंतरीची त्याला तितकीच सुंदर साथ लाभली असून, दोघांची जोडी छान दिसते. सनी देओलच्या रूपात स्मार्ट इन्स्पेक्टर पहायला मिळतो. बऱ्याच दिवसांनी दिसलेल्या पूजा भट्टची छोटीशी भूमिकाही महत्त्वाची आहे. सरन्या पोनवन्नन यांनीही कथेत एक वेगळाच रंग भरण्याचं काम केलं आहे. मराठमोळ्या प्राजक्ता परबने कमी वयात दलकीरच्या आईची साकारलेली व्यक्तिरेखा वाखाणण्याजोगी आहे.

सकारात्मक बाजू : कलाकारांचा अभिनय, पार्श्वसंगीत, दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, कॅमेरावर्क
नकारात्मक बाजू : किलर कोण असेल याचा अंदाज अगोदरच येणं, मध्यंतरानंतर थोडी गती संथ होणं

थोडक्यात : प्रचंड संख्येनं असलेले दुलकरचे चाहते हा चित्रपट पाहतीलच, पण नवं आणि जुन्याचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी इतरांनीही एकदा तरी हा चित्रपट पहायला हवा.

Web Title: Sunny Deol, Dulquer Salmaan Chup movie review IN marathi BOLLYWOOD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.