सनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक??
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 08:30 PM2018-08-21T20:30:26+5:302018-08-21T20:30:53+5:30
होय, सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकला सुगीचे दिवस आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सनी देओललाही एक प्रश्न विचारला गेला.
देओल कुटुंब सध्या आपल्या ‘यमला पगला दीवाना फिर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेन्द्र या बापलेकांचा हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने एक खास खबर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये खुद्द सनी देओलने याचा खुलासा केला. हा खुलासा कुठला तर धर्मेन्द्र यांच्या बायोपिकद्दलचा.
होय, सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकला सुगीचे दिवस आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सनी देओललाही एक प्रश्न विचारला गेला. सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकची चलती आहे. अशात धर्मेन्द्र यांचे बायोपिक बनवण्याचा विचार आहे का? असे सनीला विचारले गेले. या प्रश्नावर सनीने थेट बोलायचे टाळले पण काही अस्पष्ट संकेत मात्र नक्कीच दिले. ‘सध्या बायोपिक एक ट्रेंड बनला आहे. पापाच्या आयुष्यावर चित्रपट काढण्याची कल्पना चांगली आहे. पण एक चांगला लेखक आणि दिग्दर्शक मिळाल्यानंतरच ही कल्पना प्रत्यक्षात येणे शक्य आहे. केवळ ट्रेंड आहे म्हणून आम्हाला पापाजींचे बायोपिक बनवायचे नाही. या बायोपिकची स्क्रिप्ट तयार करण्यासाठी आपला वेळ खर्ची घालणारा लेखक आम्हाला मिळायला हवा. हे सोपे नक्कीच नाही. कारण पापा स्वत: या बायोपिकमध्ये सहभागी असतील. तसेही चाहत्यांना पापाबद्दल सगळे काही ठाऊक आहे. त्यामुळे या बायोपिकमध्ये काही नवे असायला हवे. अर्थात पापाच्या आयुष्यावर चित्रपट बनणार असेल तर मटेरियलची कमतरता पडणार नाहीच,’ असे सनी म्हणाला. तुला आॅनस्क्रीन धरमजी बनायला आवडेल का? असेही त्याला विचारले गेले. यावर सनीने अगदी प्रामाणिक उत्तर दिले. ‘खरे सांगायचे तर मी याबद्दल विचार केलेला नाही. माझ्या व पापाच्या बॉडी लँग्वेजमध्ये बरेच साम्य आहे, हे मला ठाऊक आहे. केवळ मीच नाही तर माझा मुलगा सुद्धा पापाच्या बालपणीची भूमिका वठवू शकतो. कारण तोही बराच पापांसारखा दिसतो,’असे तो म्हणला. सनीच्या या बोलण्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे,पापा धरमजींचे बायोपिक बनवण्याचा विचार त्याच्या मनात कदाचित फार पूर्वीच आलाय. येत्या काळात कदाचित हा विचार आणखी पक्का झालेलाही आपल्याला दिसेल.