साउथकडून शिका रे...! सनी देओलचा हिंदी फिल्ममेकर्सला सल्ला; म्हणाला, "तिथेच सेटल होतो"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 12:37 IST2025-03-25T12:36:50+5:302025-03-25T12:37:14+5:30
साऊथमध्ये जाऊन सेटल व्हायची सनी देओलने व्यक्त केली इच्छा

साउथकडून शिका रे...! सनी देओलचा हिंदी फिल्ममेकर्सला सल्ला; म्हणाला, "तिथेच सेटल होतो"
अभिनेता सनी देओल Sunny Deol) आगामी 'जाट' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन तेलुगू दिग्दर्शक गोपिचंद मालिनेनी यांनी केलं आहे. हा त्यांचा पहिलाच हिंदी सिनेमा असणार आहे. तर मैत्री मूव्ही मेकर्सने सिनेमाची निर्मिती केली. दाक्षिणात्य फिल्ममेकर्ससोबत काम करून सनी देओल खूपच प्रभावित झाला आहे. त्याने साउथचं खूप कौतुक केलं असून तिथेच सेटल होण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. तसंच हिंदी फिल्ममेकर्सना महत्वाचा सल्ला दिला आहे.
सनी देओलने २४ मार्च रोजी 'जाट' सिनेमाच्या ट्रेलर लाँचला उपस्थिती लावली. मुंबईत याचं ट्रेलर लाँच पार पडलं. यावेळी तो म्हणाला, "मुंबईतील हिंदी निर्मात्यांनी साउथकडून बऱ्याच गोष्टी शिकायला हव्या असं मला वाटतं. आधी तर बॉलिवूड म्हणणं बंद केलं पाहिजे आणि हिंदी सिनेमा संबोधलं पाहिजे. सिनेमा प्रेमाने कसा बनवतात हे साऊथ फिल्ममेकर्सकडून शिकायला हवं. मला त्यांच्यासोबत काम करताना खूप छान वाटलं. मी त्यांना पुन्हा सोबत काम करुया असंही म्हटलं आहे. कदाचित मी साऊथमध्येच जाऊन सेटल होईन."
हिंदी सिनेमा नक्की कुठे कमी पडतोय? यावर तो म्हणाला, "पूर्वी दिग्दर्शकाने गोष्ट सांगितल्यावर निर्मात्याला ती आवडायची. मग दोघं मिळून सिनेमा बनवायला घ्यायचे. पण हा एक बिझनेस झाला आहे सगळं खूप कमर्शियल झालं आहे. यामुळे सिनेमा बनवण्यातला आनंदच गेला आहे. यात प्रत्येकाचं शोषण होतंय. ज्यांना सिनेमा बनवायची भूक होती ते मागेच राहिलेत."
सनी देओलच्या आधी अनुराग कश्यपनेही साऊथ फिल्ममेकर्स, साऊथ सिनेमांची कथा यांचं कौतुक केलं होतं. तसंच मुंबई सोडून साऊथलाच स्थायिक व्हायची इच्छा व्यक्त केली होती. सनी देओलच्या 'जाट' सिनेमात रणदीप हुडा, विनीत कुमार सिंह, संयमी खेर यांचीही भूमिका आहे. सिनेमात जबरदस्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. सिनेमाचे निर्माते मैत्री मूव्हीज यांनीच 'पुष्पा' फ्रँचायझीची निर्मिती केली होती. १० एप्रिल रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे.