सनी देओलच्या लेकाचा पहिलाच सिनेमा ठरला सुपरफ्लॉप? फक्त ९० तिकिटांची विक्री झाल्याचा बॉलिवूड अभिनेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 10:51 AM2023-10-07T10:51:06+5:302023-10-07T10:52:09+5:30
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सनी पाजीचा लेक राजवीर देओलनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 'दोनो' हा त्याचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
८०-९०च्या दशकात अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा दमदार अभिनेता म्हणजे सनी देओल. १९८३ साली बेताब चित्रपटातून पदार्पण केलेल्या सनीला संपूर्ण सिनेसृष्टी सनी पाजी म्हणून ओळखते. ढाई किलो का हात, तारीख पे तारीख हे त्याच्या चित्रपटातील डायलॉग आजही लोकप्रिय आहेत. क्रेझ काय असते हे सनीने गदर २ मधून दाखवून दिलं. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सनी पाजीचा लेक राजवीर देओलनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 'दोनो' हा त्याचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पण, सनी पाजीच्या लेकाच्या पहिल्याच चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.
गुरुवारी(५ ऑक्टोबर) राजवीर देओलचा 'दोनो' हा चित्रपट प्रदर्शित झाला. लेकाच्या पहिल्या चित्रपटासाठी सनी देओलही उत्सुक होता. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल फेल ठरल्याचा दावा बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खानने(केआरके) केला आहे. यासंदर्भात त्याने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी फक्त ९० तिकिटांची विक्री झाल्याचं म्हटलं आहे. तर शनिवारी ४२ आणि रविवारी ४३ तिकीटे विकली गेल्याचं त्याने म्हटलं आहे. ही तिकिटे निर्मात्यांनी विकत घेतल्याचं केआरकेने म्हटलं आहे.
Sunny Deol’s son film #Dono has destroyed, advance booking records of #Pathan and #Jawan at Cinepolis.
— KRK (@kamaalrkhan) October 5, 2023
For Friday - 90 Tickets!
For Saturday- 42 Tickets!
For Sunday- 43 Tickets!
I am sure, only producers have bought these tickets.🤪😂😁😁😁
'दोनो' चित्रपटातून सनी देओलचा लेक राजवीर देओलबरोबरच अभिनेत्री पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा ढिल्लन हिनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन सूरज बडजात्या यांच्या लेकाने केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, २० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी एक कोटींचीही कमाई केली नसल्याचं म्हणण्यात आलं आहे.