सनी देओलचा ‘मोहल्ला अस्सी’ आता आमच्या हातात नाही - पहलाज निहलानी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2016 09:48 PM2016-12-29T21:48:32+5:302016-12-29T21:48:32+5:30
आपल्या वादग्रस्ट वक्तव्याने चर्चेत राहणारे सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी)चे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी आता आपल्या शब्दांचे बाण ...
दिग्दर्शक चंद्र प्रकाश द्विवेदी यांच्या ‘मोहल्ला अस्सी’ चित्रपटात सनी देओल, साक्षी तन्वर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा वाद दिल्ली उच्च न्यायालयात पोहचला होता. याचिकेत दिग्दर्शक चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी सनी देओल अभिनित या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात उशीर होत असल्याची विनंती केली होती. न्यायालयाने सीबीएफसीने यावर आपला निर्णय द्यावा असा आदेश दिला होता. मात्र, ही जाबबदारी टाळत सीबीएफसीचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी ‘फिल्म अॅफिलेट सर्टीफिकेट ट्रिब्युनल’कडे हे प्रकरण सोपविल्याचे सांगितले आहे. ‘मोहल्ला अस्सी’ हा चित्रपट वाराणसीच्या मंदिरात व घाटांवरील व्यवासायिकरणावर आधारित आहे.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार; पहलाज निहलानी यांनी हे प्रकरण आता आपल्या हातात नसल्याचे सांगितले आहे. पहलाज निहलानी म्हणाले, सीबीएफसीच्या चौकशी समिती व पुनर्निरिक्षण समिती या दोन्हीने मोहल्ला अस्सी या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. आता हे प्रकरण न्यायाधिकरणाकडे (फिल्म अॅफिलेट सर्टीफिकेट ट्रिब्युनल) सोपविण्यात आले आहे. आता तेथे काय होईल याची मला माहिती नाही. ज्या चित्रपटाचा उल्लेख तुम्ही करीत आहात तो चित्रपटावर कार्यवाही करण्याचे आमच्या हातात नाही.
मोहल्ला अस्सी हा चित्रपट मागील वर्षी आॅनलाईन लीक झाला होता. यात सनी देओल व साक्षी तन्वर यांचे संवाद हिंदू प्रतिकांवर आघात करणारे असल्याचे सांगण्यात आल्याने त्यावर चांगलीच टिका करण्यात आली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी अनेक धार्मिक संघटनांनी पुढाकार घेतला होता. दरम्यान या चित्रपटाला सीबीएफसीने प्रमाणपत्र द्यावे अशी याचिका निर्मात्यांनी केली होती.