बेंगळुरूमध्ये होणार सनी लिओनीचा इव्हेंट; पण ‘या’ अटीवर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 12:17 PM2018-09-26T12:17:37+5:302018-09-26T12:18:31+5:30
येत्या ३ नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये सनी लिओनीचा कॉन्सर्ट होऊ घातला आहे. पण त्याआधीच हा कार्यक्रम वादात सापडला आहे. होय, या इव्हेंटमध्ये सनी लिओनीचे तीन परफॉर्मन्स होणार आहेत.
येत्या ३ नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये सनी लिओनीचा कॉन्सर्ट होऊ घातला आहे. पण त्याआधीच हा कार्यक्रम वादात सापडला आहे. होय, या इव्हेंटमध्ये सनी लिओनीचे तीन परफॉर्मन्स होणार आहेत. यापैकी एक परफॉर्मन्स कन्नड गाण्यावर होईल. पण कन्नड कार्यकर्त्यांनी सनीच्या या इव्हेंटवरून गोंधळ घालणे सुरू केले आहे. सनीचा कार्यक्रम जाहिर होताच कन्नड कार्यकर्त्यांनी त्याला विरोध करणे सुरू केले. सुरूवातीला हा इव्हेंट रद्द करण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली. असे न झाल्यास अख्खा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी दिली. पण आताश: या कार्यकत्यांनी काहीशी मवाळ भूमिका घेत, सनीचा इव्हेंट आयोजित करणाऱ्या आयोजकांपुढे एक अट ठेवली आहे. होय, सनीने फक्त कन्नड गाण्यांवर परफॉर्मन्स करावा अशी अट कन्नड कार्यकर्त्यांनी ठेवली आहे. कर्नाटक रक्षणा वेदिकाचे प्रमुख प्रवीण शेट्टी यांनी याबद्दल आपली भूमिका मांडली. सनी लिओनीच्या शहरातील इव्हेंटला आमचा विरोध नाही. ती परफॉर्मन्स करू शकते. पण या इव्हेंटमध्ये केवळ आणि केवळ कन्नड भाषेचाच प्रचार व्हायला हवा, असे ते म्हणाले.
यापूर्वी गतवर्षी बेंगळुरातील सनीच्या न्यू ईअर इव्हेंटवरून मोठा वाद झाला होता. हा इव्हेंट कन्नड सभ्यतेच्या विरूद्ध असल्याचा दावा कन्नड कार्यकर्त्यांनी केला होता. सनीचा शो रद्द न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याची धमकीही या कार्यकर्त्यांनी दिली होती. राज्य सरकारही सनीच्या विरोधात आले होते. यानंतर कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी पोलिसांना निर्देश देत सनीचा इव्हेंट रोखण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी सनीला सुरक्षा देण्यास नकार दिला होता. तेव्हा कुठे सनीने हा इव्हेंट रद्द केला होता.