मालेगावची पोरं बनवणार 'शोले'? 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव'चा ट्रेलर पाहाच, फरहान अख्तरची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:26 IST2025-02-12T15:17:43+5:302025-02-12T15:26:10+5:30
फरहान अख्तर निर्मित 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज झालाय (Superboys Of Malegaon)

मालेगावची पोरं बनवणार 'शोले'? 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव'चा ट्रेलर पाहाच, फरहान अख्तरची निर्मिती
बॉलिवूडमध्ये एकामागोमाग एक दमदार विषयांचे सिनेमे येत आहेत. अशातच बॉलिवूडमधील एका अनोख्या विषयावरील सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झालाय. या सिनेमाचं नाव आहे 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव'. या सिनेमाची निर्मिती फरहान अख्तरने केली आहे. याशिवाय सुपरहिट सिनेमांची पटकथा लिहिणाऱ्या रीमा कागती यांनी 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव'चं दिग्दर्शन केलंय. मालेगाव येथील खऱ्या घटनांवर आधारीत हा सिनेमा असणार आहे.
'सुपरबॉइज ऑफ मालेगाव'चा ट्रेलर
आज मुंबईत 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव'चा ट्रेलर लाँच झाला. या ट्रेलरमध्ये मालेगावला राहणारे हौशी तरुण दिसतात. एका मुलाचं खजुराचं दुकान असतं, एक बेरोजगार असतो तर दुसऱ्याला सिनेमांंचं वेड असतं. हे तरुण एकत्र येऊन सिनेमा बनवण्याचं स्वप्न पाहतात. मग हे स्वप्न ते कसं पूर्ण करतात, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, याची कहाणी 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' सिनेमात बघायला मिळते.
कधी रिलीज होणार 'सुपरबॉइज ऑफ मालेगाव'?
भारतातील मालेगाव शहरातील नासिर शेख आणि इतर हौशी चित्रपट निर्मात्यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारीत आहे. या सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल सांगायचं तर, विनीत कुमार सिंग, आदर्श गौरव, शशांक अरोरा, अनुज सिंह दुहान, साकिब अयूब, पल्लव सिंह हे कलाकार सिनेमात झळकणार आहे.२८ फेब्रुवारी २०२५ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव'ची उत्सुकता शिगेला आहे.