अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या बाईला कोर्टाने दिला हा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 07:43 PM2020-01-30T19:43:45+5:302020-01-30T19:46:04+5:30
सुप्रीम कोर्टाने आता अनुराधा पौडवाल यांना दिलासा देणारा निर्णय दिला आहे.
केरळमधील एका महिलेने 67 वर्षांच्या अनुराधा पौडवाल यांच्याबद्दल काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक खुलासा केला होता. अनुराधा पौडवाल आपली आई असल्याचा दावा या महिलेने केला होता. अनुराधा आपली आई असल्याचा दावा करणारी ही महिला तिरूवनंतपूरमची राहणारी असून करमाला मोडेक्स हे तिचे नाव आहे. या 45 वर्षाच्या महिलेने अनुराधा पौडवाल यांच्याविरोधात तिरुअनंतपुरम येथील कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला होता. अनुराधा यांच्याकडून तिने 50 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचीही मागणी केली होती.
सुप्रीम कोर्टाने आता अनुराधा पौडवाल यांना दिलासा देणारा निर्णय दिला आहे. आता सुप्रीम कोर्टाने तिरूवनंतपूरममध्ये सुरू असलेल्या खटल्याला स्थगिती दिली आहे. एवढेच नव्हे तर करमाला मोडेक्सला एक नोटिस देखील दिली आहे. अनुराधा पौडवाल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून तिरूवनंतपूरममध्ये सुरू असलेला खटला मुंबईतील फॅमिली कोर्टात चालवला जावा अशी मागणी केली होती.
करमालाच्या दाव्यानुसार, तिचा जन्म 1974 साली झाला होता. ती अवघी चार दिवसांची असताना अनुराधा यांनी तिला पोन्नाचन आणि अॅग्नेस या दाम्पत्याला दिले होते. करमालाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मला जन्म देणारी आई अनुराधा पौडवाल असल्याचे मला पाच वर्षांपूर्वी कळले. माझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी मला हे सत्य सांगितले. मी चार दिवसांची असताना अनुराधा यांनी मला माझे पालक पोन्नाचन आणि अॅग्नेस यांच्याकडे मला सोपवले होते. माझे वडील आर्मीत होते आणि महाराष्ट्रात कर्तव्यावर होते. ते अनुराधा यांचे चांगले मित्र होते. कालांतराने त्यांची बदली केरळमध्ये झाली. अनुराधा त्यावेळी आपल्या करिअरमध्ये बिझी होत्या आणि बाळाची जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी नव्हती, त्यामुळे त्यांनी मला दुसऱ्याला सोपवले. पण आता मला माझी आई परत हवीय.’