Sushant Singh Rajput Suicide : SHOCKING! बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 02:40 PM2020-06-14T14:40:54+5:302020-06-14T14:41:51+5:30
टीव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
टीव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार, नोकराने फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिस सुशांतच्या घरी पोहोचले आहेत. त्याच्या आत्महत्येच्या बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.
सुशांतने आत्महत्येसारखे इतके टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र नैराश्यातून त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
सुशांत एक लोकप्रिय अभिनेता होता. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुशांतने छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘किस देश में हे मेरा दिल’ ही त्याची पहिली मालिका होती. यानंतर एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतला संधी मिळाली आणि या एका संधीने त्याचे आयुष्य बदलले. या मालिकेने सुशांतला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेनंतर सुशांत बॉलिवूडकडे वळला होता.
‘काय पो छे’ या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात तो झळकला. पण बॉलिवूडमध्ये त्याला खरी ओळख दिली ती ‘एम एस धोनी-अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाने. या सिनेमात त्याने भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एम. एस. धोनीची भूमिका साकारली होती. त्याने धोनीची भूमिका पडद्यावर अशी काही जिवंत केली की, या सिनेमाने इतिहास रचला. हा सुशांतचा पहिला सुपरडुपर हिट सिनेमा होता. या चित्रपटानंतर ‘केदारनाथ’ या सिनेमात तो सारा अली खानसोबत दिसला होता. सोनचिडीया, छिछोरे या सिनेमातही त्याने काम केले.