अंतहीन स्वप्ने आणि क्षणभंगूर जीवन... ! 10 दिवसांपूर्वी सुशांत सिंग राजपूतने आईसाठी लिहिली होती ही भावूक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 03:30 PM2020-06-14T15:30:47+5:302020-06-14T15:31:29+5:30
मृत्यूला कवटाळण्यापूर्वी सुशांतने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. ही पोस्ट त्याच्या आईसाठी होती.
सुशांत सिंग राजपूत याने आज आपल्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सुशांत गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता आणि याच नैराश्यापोटी त्याने आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. मात्र सुशांत सारख्या इतक्या लोकप्रिय अभिनेत्याने आत्महत्या का करावी हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.
मृत्यूला कवटाळण्यापूर्वी सुशांतने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. ही पोस्ट त्याच्या आईसाठी होती. आईच्या आठवणीने सुशांत व्याकूळ झाला होता, हे ही पोस्ट वाचल्यानंतर कळते.
3 जूनला शेअर केलेल्या या पोस्टमध्ये सुशांतने आईचा फोटो लावला आहे. ‘ अश्रूंनी अस्पष्ट होत चाललेला भूतकाळ... अंतहीन स्वप्ने आणि क्षणभंगूर जीवन दोघांमध्ये वाटाघाटी सुरु आहेत... आई,’असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले होते.
आईसाठी लिहिलेली सुशांतची ही पोस्ट बरेच काही सांगणारी आहे. सुशांत 16 वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले होते. सुशांत आईच्या जवळ होता. अनेकदा सुशांतने आईच्या आठवणीत पोस्ट शेअर केल्या होत्या.
सुशांत गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता असे कळते.