Sushant Singh Rajput : सुशांतचं ‘ब्रह्मास्त्र’ संपूर्ण बॉलिवूडचा विनाश..., बहिण मीतू सिंगचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 11:15 AM2022-09-11T11:15:09+5:302022-09-11T11:17:40+5:30
Sushant Singh Rajput : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला 2 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र अद्यापही त्याचे कुटुंबीय, मित्र, त्याचे चाहते त्याच्या निधनाच्या दु:खातून सावरलेले नाहीत.
सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) या जगाला अलविदा म्हणत कधीच निघून गेला. त्याच्या मृत्यूला 2 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र अद्यापही त्याचे कुटुंबीय, मित्र, त्याचे चाहते त्याच्या निधनाच्या दु:खातून सावरलेले नाहीत. सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर देशातील वातावरण ढवळून निघालं होतं. त्याच्या निधनानंतर अनेकांनी लोकांनी बॉलिवूडवर टीका केली होती. आता सुशांतची बहिण मीतू सिंग हिने पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे बॉलिवूडवर टीकास्त्र डागलं आहे. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडची घराणेशाही, येथील भेदभाव जबाबदार असल्याचा चाहत्यांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर मीतूने बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.
सुशांतची बहिण मीतूने एक पोस्ट शेअर केली आहे. मीतूने या पोस्टमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. पण तिच्या पोस्टमध्ये ‘ब्रह्मास्त्र’चा उल्लेख आहे. यामुळे तिचा इशारा आलिया भट व रणबीर कपूरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’कडे असल्याचं मानलं जात आहे.
मीतूची पोस्ट
मीतूने सुशांतचा एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ‘सुशांतचे ब्रह्मास्त्र या बॉलिवूड इंडस्ट्रीचा विनाश करण्यासाठी पुरेसे आहे. बॉलिवूडला नेहमीच लोकांवर राज्य करायचं आहे, एकमेकांचा आदर आणि विनम्रतेचा दिखावा करण्याचं काम बॉलिवूड सातत्याने करतं. अशा लोकांना आपण आपल्या देशाचा चेहरा कसा बनवू शकतो? ढोंग करून जनतेची मनं जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न व्यर्थ ठरला आहे. गुणवत्ता आणि नैतिक मूल्ये या एकमेव गोष्टी आहेत ज्यामुळे प्रशंसा आणि आदर मिळू शकतो,’असं तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
मीतूच्या या पोस्टनंतर सुशांत सिंग राजपूतचे चाहते पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाले आहेत. या पोस्टच्या कमेंट्समध्ये चाहत्यांनी सुशांतला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. अनेकांनी बॉलिवूडवरचा संताप व्यक्त केला आहे.
सुशांत 14 जून 2020 रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचं म्हटलं होतं. मात्र यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांच्या मागणीनंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. तेव्हापासून या प्रकरणाचा सीबीआय तपास सुरू आहे. तथाप गेल्या दोन वर्षांच्या तपासात सीबीआय अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने देखील ड्रग्जच्या अँगलने या प्रकरणात तपास केला होता. याप्रकरणी सुशांतची मैत्रीण असलेल्या रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली होती. रियासह अनेक लोकांवर सुशांतला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे.