'मृत्युनंतर त्याच्या आत्म्याला १ वर्ष त्रास झाला'; सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 06:41 PM2024-02-20T18:41:33+5:302024-02-20T18:42:05+5:30
Shweta Singh Kirti: सुशांतच्या बहिणीने श्वेता सिंह किर्तीने सुशांतविषयी अनेक खुलासे केले आहेत.
मनाला चटका लावून एक्झिट करणारा अभिनेता म्हणजे सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput). १४ जून २०२० मध्ये सुशांतने गळफास घेत आत्महत्या केली. मात्र, ही आत्महत्या होती की घातपात होता यामागचं कारण मृत्यू अद्यापही अस्पष्ट आहे. परंतु, आजही नेटकऱ्यांनी त्याची कायम चर्चा रंगते. विशेष म्हणजे सुशांतच्या निधनाचा धक्का त्याच्या बहिणीला प्रचंड बसला असून अद्यापही ती या दु:खातून सावरलेली नाही. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सुशांतविषयी मोठा दावा केला आहे.
सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती (Shweta Singh Kirti) हिने अलिकडेच एका पॉडकास्टला मुलाखत दिली. या पॉडकास्टमध्ये श्वेताने सुशांतविषयी अनेक खुलासे केले आहेत. यात मृत्युनंतर जवळपास १ वर्ष सुशांतच्या आत्माला त्रास झाला. आणि, आजही तो कैलासपर्वतावर आहे, असं ती यावेळी म्हणाली.
नेमकं काय म्हणाली श्वेता?
"सुशांतच्या निधनानंतर मी बराच वेळ ध्यानसाधनेत घालवला. त्याचं असं सोडून जाण्याचं दु:ख सहन होत नसल्यामुळे विपश्यनेपासून ते ध्यानसाधनेपर्यंत अनेक गोष्टी मी करुन पाहिल्या. सुशांतचा आत्म खूप पवित्र आणि स्ट्राँग आहे. त्याला वाटेल त्यावेळी तो त्याची उपस्थिती संबंधित व्यक्तींना जाणवू देतो. मी सुशांतला कैलास पर्वतावर पाहिलं आहे. मृत्यूनंतर जवळपास १ वर्ष त्याच्या आत्म्याला त्रास सहन करावा लागला", असा दावा श्वेताने केला.
पुढे ती म्हणते, "सुशांतचा आत्मा कैलास पर्वतावर भगवान शंकरासोबत आहे आणि तो तिकडून सगळ्यांना पाहतोय. त्याच्याकडे खूप ऊर्जा आहे. आणि, कैलास पर्वतावरही प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे. तो तिथे खूश आहे. मी कधीच कैलास पर्वत पाहिला नाही. पण, सुशांतच्या माध्यमातून कैलास पर्वत पाहिला आहे."
दरम्यान, श्वेताने नुकतंच pain (वेदना) हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून तिने प्रियजनांपासून विभक्त झाल्यावर होणाऱ्या दु:खाचा सामना कसा करावा हे सांगितलं आहे. तसंच अध्यात्मिक साधना व भक्तीचे अनुभवदेखील तिने लिहिले आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने तिने प्रितिका रावच्या पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने सुशांतविषयी अनेक खुलासे केले.