ये क्या बकवास है...! सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुलाचे नाव आल्याने भडकला आदित्य पांचोली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 13:13 IST2020-07-05T13:12:25+5:302020-07-05T13:13:51+5:30
जाणून घ्या काय आहे प्रकरण

ये क्या बकवास है...! सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुलाचे नाव आल्याने भडकला आदित्य पांचोली
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. असे असताना आता या प्रकरणाच्या निमित्ताने अचानक अभिनेता सूरज पांचोलीचे नाव चर्चेत आले आहे. सुशांतची एक्स-मॅनेजर दिशा सालियानने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर काहीच दिवसात सुशांतनेही आत्महत्या केली. या दोन्ही प्रकरणाचा एकमेकांशी संबंध आहे का, या तपास सुरु असताना दिशा प्रकरणात सूरज पांचोलीचे नाव गोवले जातेय. दिशा ही सूरजच्या मुलाची आई बसणार होती, अशी चर्चा आहे. तूर्तास या चर्चेने सूरज पांचोलीचे वडील आदित्य पांचोली जाम भडकले आहेत.
दिशा प्रकरणात सूरजचे नाव येताच आदित्य पांचोलीने संतप्त प्रतिक्रिया दिली. लोक माझ्या मुलाबद्दल इतक्या निरर्थक गोष्टी का करत आहेत, हेच मला कळत नाहीये. अशा आरोपांमुळे माझ्या मुलावर काय मानसिक परिणाम होत असेल, याचीही लोकांना पर्वा नाही. गेल्या 8 वर्षांपासून माझा मुलगा सूरजला जिया खानच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवले जातेय. कोणी त्याला रेपिस्ट म्हणतेय, कुणी खुणी ठरवत आहे. कसेबसे हे प्रकरण शांत झाले असताना सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणाशी सूरजचे नाव जोडले जातेय. या आरोपांमुळे माझ्या मुलाची वाईट अवस्था आहे. मी आणि माझी पत्नी त्याला सांभाळत आहोत. त्याने काही केले तर त्याला जबाबदार कोण असेल? अशाच कारणांनी लोक डिप्रेशनमध्ये जातात. देशात कायदा सर्वोच्च आहे. माझा मुलगा दोषी असेल तर त्याला शिक्षा मिळेल. पण चौकशी, तपास पूर्ण होईपर्यंत लोकांनी धीर धरायला हवा,’असे आदित्यने म्हटले आहे.
सोशल मीडियावर सूरजला सतत ट्रोल केले जात आहे, यावरही आदित्य पांचोलीने नाराजी व्यक्त केली. आजकाल कोणीही काहीही लिहिते आणि लोक त्याला सत्य मानतात. सत्य काय हे जाणून घेण्यात कोणालाही इंटरेस्ट नाही. पोलिस प्रकरणाचा तपास करत असताना माझ्या मुलाबद्दल वाट्टेल त्या बातम्या पसरवल्या जात आहे. माझा मुलगा दोषी असेल तर पोलिसांना आत्तापर्यंत हे कसे माहित झाले नाही. मला विचाराल तर सुशांतच्या आत्महत्येची सीबीबाय चौकशी व्हावी. म्हणजे सत्य आपोआप बाहेर येईल, असेही आदित्य पांचोली म्हणाला.
काय आहे चर्चा
सुशांतची एक्स मॅनेजर दिशा ही सूरजच्या मुलाची आई बनणार होती आणि 2017 मध्ये यावरून सुशांत व सूरज यांच्यात कथितरित्या वाद झाला होता. सूरजबद्दल सुशांतला ठाऊक होते आणि तो त्याचा पर्दाफाश करणार होता. या सगळ्या प्रकरणात सलमान खान सूरजला पाठीशी घालत होता, अशी चर्चा आहे. अर्थात सूरजने या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. कोणता वाद? मला तर दिशा कोण हेही ठाऊक नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे.