Sushant Singh Rajput Suicide: सुशांतसिंहच्या आत्महत्येने बॉलिवूडला जबर धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 05:55 AM2020-06-15T05:55:59+5:302020-06-15T07:09:29+5:30
सुशांतचे बॉलिवूडमधले यश हे अनेकांना प्रेरणादायी होते. तरीही त्याने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका का घेतली हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.
टीव्ही मालिकेपासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी मजल मारणारा अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या घटनेने बॉलिवू़ड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना धक्का बसला आहे. सुशांतचे बॉलिवूडमधले यश हे अनेकांना प्रेरणादायी होते. तरीही त्याने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका का घेतली हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. त्याच्या आत्महत्येने अनेक सेलेब्रिटींना धक्का पोहोचला असून त्यांनी आपले दु:ख ट्वीटद्वारे व्यक्त केले आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने खूपच दु:ख झाले आहे, खूपच दु:खद नुकसान आहे. त्याचे कुटुंब आणि प्रियजनांच्या प्रति खूपच संवेदना आहे. त्याच्या आत्म्याला शाश्वत शांती मिळो..! - अजय देवगण
सुशांतसिंह आता या जगात नाहीय, विश्वासच ठेवूशकत नाही. सुशांत एक अद्भुत अभिनेता होते आणि मी आजही त्यांच्यासोबतचे क्षण स्मरण केले. त्यांच्या प्रदर्शनाने मला नेहमी प्रेरित केले आहे. -वरुण धवन
सुशांतसिंह गेला हे ऐकून माझे हात थरथरत आहेत. जर एखाद्या गोष्टीवरून तू नाराज होता, तर त्याबाबत मला कॉल करून चर्चा केली असती. आम्ही सर्व इथेच होतो, तुझ्यासोबत...! -ऋचा चड्ढा
सुशांतसिंह राजपूत देखील? काय होत आहे हे? संताप होतोय. ही भयानक, भयानक बातमी आहे. कृपया आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आपल्या मित्रांशी गप्पा मारा..!
-विशाल दादलानी, गायक
आणि म्युझिक कंपोजर
सुशांतसिंहची बातमी ऐकल्यानंतर काय बोलावे यासाठी मला तर शब्द सापडत नाहीत..! - विक्की कौशल
प्रामाणिकपणे सांगतो, या बातमीने मला स्तब्ध आणि अवाक् केले. मला आठवते की, मी ‘छिछोरे’मध्ये सुशांतसिंह राजपूतला पाहत होतो आणि माझा मित्र साजिदला सांगत होतो की, या चित्रपटाच्या निर्मात्याने चित्रपटाचा किती आनंंद घेतला आहे आणि असे वाटत आहे की, या चित्रपटाचा हिस्सा असतो तर...असा प्रतिभाशाली अभिनेता...परमेश्वरा, त्याच्या कुटुंबीयांना शक्ती दे.! - अक्षय कुमार
दु:ख व्यक्त करताना शब्द सापडत नाहीत..., सुशांत सिंग राजपूत नाही राहिलेत....खूपच दु:ख झाले!
- रितेश देशमुख
मानसिक स्वास्थ्य हा खूप गंभीर विषय आहे. आपण त्याकडे जितके लक्ष देतो, त्यापेक्षा अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे आता तरी त्याकडे लक्ष द्या. संवेदनशील, सरळसाधं आणि सतत इतरांच्या मदतीला धावणे हे सध्याच्या जगात खूप महत्त्वाचे आहे. सुशांतच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.
-व्ही व्ही एस लक्ष्मण, भारताचा माजी क्रिकेटपटू
धोनीची भूमिका साकारताना सुशांतने प्रचंड मेहनत घेतली होती. एकदा सराव करत असताना सुशांतला सचिन तेंडुलकरने बघितले. सुशांतची फलंदाजी बघून सचिनही अवाक झाला होता. सुशांतचा सराव संपल्यानंतर थोड्या वेळानं तो म्हणाला, जर त्याची इच्छा असेल, तर तो प्रोफेशनल क्रिकेट खेळू शकतो. तो चांगला खेळाडू असल्याचं सचिनला दिसले होते
अंकिता लोखंडेलाही धक्का बसला
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूने अंकिता लोखंडेला धक्का बसला. तिने -काय- एवढा एकच शब्द तिच्या तोंडून बाहेर पडला.
आधी अंकिता नंतर रिया....
सुशांतसिंह राजपूत हा काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरील सह-अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. 'पवित्र रिश्ता'मध्ये ही जोडी एकत्र दिसली होती. काही काळ सुशांत आणि अंकिता लिव्ह-इन रिलेशनशीपमध्येही राहत होते. मात्र, २०१६ मध्ये या दोघांनी एकमेकांपासून अलग होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या काही काळापासून सुशांतचं नाव रिया चक्रवर्ती हिच्यासोबत जोडले जात होते. मात्र, दोघांकडूनही याबाबत अधिकृतपणे दुजोरा देण्यात आला नव्हता.
यावर्षी बोहल्यावर चढणार होता?
पूर्णिया जिल्ह्यातील मलडिहामध्ये राहणारे सुशांतचे चुलत भाऊ पन्नासिंह यांच्या दाव्यानुसार, सुशांतसिंह राजपूत याच वर्षी बोहल्यावर चढणार होता. येत्या नोव्हेंबर महिन्यात त्याच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याची तयारी सुरू होती. परंतु, सुशांत कुणासोबत विवाहबद्ध होणार होता, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. गेल्या आठवड्यात सुशांतसिंहचे वडील के. के. सिंह यांच्याशी ४५ मिनिटे बोललो. त्यांनी सर्व काही ठीक असल्याचे सांगितले होते. सुशांतचे नोव्हेंबर महिन्यात लग्न आहे, मुंबईला जाण्याची तयारी करून ठेवा, असे ते म्हणाले होते.