रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढणार; सुप्रीम कोर्ट म्हणाले, सत्य समोर यायलाच हवे...!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 03:47 PM2020-08-05T15:47:24+5:302020-08-05T15:48:13+5:30
रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी
सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीला कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला आहे. यामुळे येत्या दिवसांत रियाच्या अडचणींमध्ये भर पडणार, हे निश्चित आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.
सुशांत सिंग राजपूतप्रकरणी रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेला खटला मुंबईत हस्तांतरित करण्याची मागणी तिने या याचिकेत केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांना सुशांतप्रकरणी आत्तापर्यंत झालेल्या तपासाचे सर्व दस्तऐवज सोपवण्यासाठी 3 दिवसांचा वेळ दिला तसेच पुढील सुनावणी एका आठवड्यानंतर होईल, असे स्पष्ट केले. रिया चक्रवर्तीला कुठलाही दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. हे प्रकरण पाटण्यातून मुंबईला हस्तांतरित व्हावे, अशी याचिकाकर्तीची इच्छा आहे. मात्र याचिकाकर्ती रियाविरोधात गंभीर आरोप आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटले.
सत्य समोर यायला हवे...
एक प्रतिभावान अभिनेता जगातून गेला. असामान्य स्थितीत त्याचा मृत्यू झाला. सत्य समोर यायलाच हवे, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना म्हटले.
बिहारच्या पोलिस अधिका-याला क्वारंटाईन केल्याबद्दल फटकारले
सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांनाही फटकारले. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा चांगली आहे, यात वाद नाही. पण बिहार पोलिस अधिका-याला क्वारंटाइन करून कोणताही चांगला संदेश गेला नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले.
रियावर काय आहेत आरोप
सुशांतच्या वडिलांनी गेल्या 26 जुलैला पाटणाच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात रिया व तिच्या कुटुंबाविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यांनी रियावर सुशांतला ब्लॅकमेल करणे, आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, खंडणी असे अनेक गंभीर आरोप केले आहेत.