सुशांत आत्महत्येप्रकरणी कुकची पुन्हा झाली चौकशी, या व्यक्तीचाही दुसऱ्यांदा नोंदवला जाणार जबाब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 03:32 PM2020-07-14T15:32:56+5:302020-07-14T15:33:21+5:30
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आज महिना झाला आहे. मात्र अद्याप सुशांतने आत्महत्या का केली याबाबत मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आज महिना झाला आहे. मात्र अद्याप सुशांतने आत्महत्या का केली याबाबत मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या हाती अद्याप कोणताही ठोस पुरावा लागला नाही आहे. दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की सुशांतचा कुक नीरजची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. आत्महत्येच्या तीन दिवस आधी सुशांतने नेमके काय केले, काय खाल्ले यासारख्या प्रत्येक सविस्तर माहिती पोलिसांनी या कुककडून घेतली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांतचा कुक नीरजची मुंबई पोलिसांनी तब्बल 6 तास चौकशी केली. पोलिसांनी त्याच्याकडे आत्महत्येच्या 3 दिवस आधीची अर्थात 11 ते 14 जून दरम्यानची सुशांतबाबतची सर्व माहिती विचारुन घेतली आहे. या दरम्यान सुशांतची कोणाशी बातचीत झाली ते त्याने काय खाल्ले याबाबतची माहिती नीरजला विचारण्यात आली. याचबरोबर अशी माहिती समोर येत आहे की, आज मंगळवारी सुशांतची बहिण मितूला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. पोलिसांकडून तिला 14 जून आधी 3 महिन्यापूर्वी झालेली सुशांतबरोबरची भेट, त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीबरोबरचे संबंध, त्यांची भांडणं यासंदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. सुशांतच्या बहिणीचा देखील जबाब दुसऱ्यांदा नोंदवला जाऊ शकतो.
सुशांतला 2008 मध्ये टीव्हीवर पहिला ब्रेक बालाजी टेलीफिल्म्सचा शो 'किस देश में है मेरा दिल'मध्ये मिळाला. परंतू, त्याला खरी ओळख 2009 ते 2011 दरम्यान आलेली मालिका 'पवित्र रिश्ता'मधून मिळाली. साचेबद्ध काम करण्यात रस नसून वेगळे काहीतरी करण्याच्या प्रयत्न करणा-यापैकी सुशांत होता.
त्यानंतर सुशांतला 2013 मध्ये बॉलिवूडचा पहिला चित्रपट 'काई पो छे' मिळाला. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात तो झळकला. पण बॉलिवूडमध्ये त्याला खरी ओळख दिली ती ‘एम एस धोनी-अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाने. या सिनेमात त्याने भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एम. एस. धोनीची भूमिका साकारली होती. त्याने धोनीची भूमिका पडद्यावर अशी काही जिवंत केली की, या सिनेमाने इतिहास रचला. हा सुशांतचा पहिला सुपरडुपर हिट सिनेमा होता. या चित्रपटानंतर ‘केदारनाथ’ या सिनेमात तो सारा अली खानसोबत दिसला होता. सोनचिडीया, छिछोरे या सिनेमातही त्याने काम केले होते.