तब्बल 9 तास कसून चौकशी, सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीने केले काही धक्कादायक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 02:06 PM2020-06-19T14:06:26+5:302020-06-19T14:20:17+5:30
रियाला तिचे सुशांतसोबतचे संबंध, दोघांची बॉन्डिंग, त्याचे डिप्रेशन आणि सुशांतचे इंडस्ट्रीसोबतचे संबंध यावर अनेक प्रश्न विचारण्यात आलेत. यादरम्यान रियाने काही धक्कादायक खुलासे केल्याचे कळतेय.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी वेगवेगळ्या चार तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. पोलीस अनेकांचे जबाब नोंदवत आहेत. वांद्रे पोलिसांनी काल सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीची तब्बल 9 तास विचारपूस करत तिचा जबाब नोंदवला . रिया सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झाली आणि रात्री 9 च्या सुमारास बाहेर पडली. यादरम्यान ती प्रचंड चिंतेत दिसली. पोलिस चौकशीत रियाला तिचे सुशांतसोबतचे संबंध, दोघांची बॉन्डिंग, त्याचे डिप्रेशन आणि सुशांतचे इंडस्ट्रीसोबतचे संबंध यावर अनेक प्रश्न विचारण्यात आलेत. यादरम्यान रियाने काही धक्कादायक खुलासे केल्याचे कळतेय.
पिंकविलाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत याबद्दल माहिती दिलीय. या वृत्तानुसार, सर्वप्रथम रियाला सुशांतसोबतचे तिचे संबंध आणि लग्नाबद्दल विचारले गेले. यादरम्यान पोलिसांनी दोघांमधील मॅसेज दाखवायला सांगितले. तिचा मोबाईल स्कॅन करण्यात आला.
सुशांत व मी लवकरच घर घेणार होतो आणि 2020 च्या अखेरपर्यंत लग्न करण्याचा आमचा विचार होता़, असे रियाने यावेळी पोलिसांना सांगितल्याचे कळते.
रिया व सुशांत कार्टर रोडस्थित पेंटहाऊसमध्ये राहत होते. येथे सुशांतचा मित्रही त्यांच्यासोबत राहायचा. सुशांतच्या निधनाच्या काही दिवस आधी रियाने हे घर सोडले होते. पोलिसांना ही गोष्ट खूप खटकली. याबद्दल विचारले असता तिने सांगितले की, सुशांतचे घर सोडण्यापूर्वी दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते. या भांडणानंतरचे एकमेकांना केलेले मॅसेजही तिने पोलिसांना दाखवले. या भांडणानंतर दोघांमध्ये फोनवर बोलणे झाले होते, हेही तिने सांगितले.
कॉल रेकॉर्डनुसार, सुशांतने आत्महत्येपूर्वी काही तास आधी रियाला फोन केला होता. रियाच्या आधी त्याने त्याचा मित्र महेश शेट्टीलाही फोन केला होता. मात्र रियाने त्याचा फोन उचलला नव्हता.
9 तास विचारपूस
पोलिसांनी जवळपास नऊ तास रिया चक्रवतीर्चा जबाब नोंदवून विचारपूस केली. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब संध्याकाळी 9च्या सुमारास संपला. नऊ तास पोलीस तिच्याकडून माहिती घेत होते. रियाने पोलिसांना सविस्तर उत्तरं दिली. या जबाब नोंदणीनंतर आता संंबंधित विभागाचे डीसीपी हे सुद्धा रियाकडे चौकशी करण्याची शक्यता आहे.
सुशांत सिंग राजपूत याने रविवारी (14 जून 2020) राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुरुवातीला वांद्रे पोलीस तपास करत आहेत.