सुशांतचा व्हिसेरा योग्यरित्या प्रिझर्व्ह केला गेला नाही?
By रूपाली मुधोळकर | Published: September 20, 2020 01:54 PM2020-09-20T13:54:21+5:302020-09-20T13:55:00+5:30
एम्सच्या सूत्रांनी केला नवा दावा
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. तीन महिने उलटूनही तीन तपास यंत्रणांना सुशांतच्या मृत्यूप्रकरणी कुठल्याही ठोस निष्कर्षावर पोहोचता आलेले नाही. तूर्तास सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एक ना अनेक दावे, रोज नवे खुलासे होत असताना आता एक ताजी माहिती समोर येतेय. होय, सुशांतचा व्हिसेरा योग्यरित्या प्रिझर्व्ह केला नव्हता आणि यामुळे तपासात अडचणी येत आहेत, असा नवा खुलासा आता झाला आहे. सुशांतचा मृत्यू विषामुळे झाला की ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे या अँगलनेही सुशांतप्रकरणाचा तपास सुरु आहे. या पार्श्वभूमीवर व्हिसेरा अहवाल अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
आॅल इंडिया इन्स्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सच्या सूत्राच्या हवाल्याने एआयएनएसने याबाबतचे वृत्त दिले आहे. फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंटला सुशांतचा जो व्हिसेरा मिळाला, तो अतिशय कमी होता शिवाय योग्यरित्या संरक्षित ठेवला गेला नव्हता. सूत्रांनी सांगितले की, व्हिसेरा योग्य नव्हता. यामुळे केमिकल व टॉक्सिकोलॉजिकल चाचण्यांमध्ये अनेक समस्या जाणवत आहेत.
सुशांतच्या फार्महाऊसमधून सापडल्या काही नोट्स, मोठे खुलासे होण्याची शक्यता
मुंबई पोलिस म्हणते, आमच्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न
सुशांतचा व्हिसेरा योग्यरित्या संरक्षित केला गेला नसल्याचा दावा होत असला तरी मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिका-याने हा दावा नाकारला आहे. सुशांत प्रकरणाशी संबंधित सर्व फॉरेन्सिक व कागदोपत्री पुरावे सुरक्षित ठेवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. आम्ही अनेक हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास केला आहे. तपासाच्याबाबतीत मुंबई पोलिस प्रचंड प्रोफेशनल आहे़, असे हा अधिकारी म्हणाला.
एम्सच्या रिपोर्टची प्रतीक्षा
सुशांतचा पोस्टमार्टम आणि व्हिसेरा अहवाल बनविण्यासाठी एम्सच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांची विशेष टीम गठीत करण्यात आली आहे. या अहवालातून सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या की हत्या हे स्पष्ट होणार आहे. आज 20 सप्टेंबरला संबंधित टीम आपला अहवाल सीबीआयला सोपवणार होती. मात्र आता सीबीआय व एम्स टीमची बैठक मंगळवारी होणार आहे.