सुशांतच्या चाहत्यांची वर्तणूक पडली भारी, अंकिताला बॉयफ्रेंडची मागावी लागली माफी
By तेजल गावडे | Published: November 2, 2020 02:22 PM2020-11-02T14:22:24+5:302020-11-02T14:22:49+5:30
सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांच्यावर त्याच्या चाहत्यांनी टीका केली होती.
'पवित्र रिश्ता' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या कठीण काळातून जात आहे. सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे स्वतःला बिझी ठेवत असते. या दरम्यान तिच्यावर सातत्याने टीकादेखील होताना दिसली. नुकतेच तिने एक पोस्ट शेअर करत तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनची खुल्लमखुल्ला सर्वांसमोर माफी मागितली आहे. अंकिता लोखंडेने या पोस्टसोबत स्वतःचा आणि विक्की जैनचा फोटो शेअर केला आहे.
या पोस्टमध्ये अंकिता लोखंडेने लिहिले की, तुझ्यासाठी माझ्या असलेल्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. जेव्हा मी आपल्या दोघांना एकत्र पाहते तेव्हा माझ्या डोक्यात सर्वात आधी एकच गोष्ट येते की माझ्या जीवनात एक मित्र, पार्टनर आणि सोलमेटसारखा व्यक्ती पाठवल्यामुळे मी देवाची आभारी आहे. माझ्या प्रत्येक अडचणीत साथ दिल्याबद्दल आभारी आहे. माझी प्रत्येक अडचण स्वतःची समजून माझी मदत केल्यामुळे मी आभारी आहे. माझा सपोर्ट सिस्टम बनण्यासाठी मी आभारी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आणि माझी परिस्थिती समजून घेतली त्यासाठी आभारी आहे.
पुढे अंकिताने विक्की जैनची माफी मागत म्हटले की, माझ्यामुळे तुला टीका सहन करावी लागली त्यासाठी मला माफ कर. शब्द कमी पडतील पण आपले बॉण्डिंग खूप छान आहे. आय लव्ह यू.
सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांच्यावर त्याच्या चाहत्यांनी टीका केली होती. अंकिता लोखंडेने प्रत्येक टीकेचा सामना केला. तर विक्की जैनने इंस्टाग्रामवर कमेंट बॉक्स बंद केला होता.
सुशांतच्या निधनानंतर काही चाहत्यांनी त्याच्या मृत्यूसाठी अंकिता आणि विक्की जैनला जबाबदार ठरविले होते.