कोण होता सुश्मिताचा पहिला बॉयफ्रेंड?;अभिनेत्रीच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी सोडली होती नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 11:39 AM2024-03-06T11:39:02+5:302024-03-06T11:39:18+5:30
Sushmita sen: सुश्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिच्या पहिल्या प्रियकराविषयी भाष्य केलं होतं.
१९९४ साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकत अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita sen) हिने भारताचं नाव जगभरात गाजवलं. त्यामुळेच तिला ब्रेन विथ ब्युटी असं म्हटलं जातं. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी ही अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये तितकीच लोकप्रिय आहे. त्यामुळे तिच्याविषयी वरचेवर नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. सध्या सोशल मीडियावर सुश्मिताच्या पहिल्या प्रियकराची चर्चा रंगली आहे. त्याने सुश्मितासाठी चक्क त्याची नोकरी सोडली होती.
गेल्या काही वर्षांमध्ये सुश्मिताचं नाव अनेक अभिनेता, दिग्गज व्यक्तींसोबत जोडलं गेलं. मात्र, एकेकाळी एका व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत होती. ती व्यक्ती म्हणजे रजत तारा. सुश्मिता मिस युनिव्हर्स व्हावी यासाठी त्याने चक्क त्याच्या नोकरीवर पाणी सोडलं होतं. सुश्मिता ही स्पर्धा जिंकल्यानंतर जवळपास २ वर्षांनी तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी घेण्यात आलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने रजत ताराविषयी भाष्य केलं होतं.
सोशल मीडियावर सुश्मिताचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती फारुक शेख यांच्या जीना इसी का नाम हैं या टॉक शो मध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमात बोलत असताना तिने रजत ताराचा उल्लेख केला होता.
रजत ताराने सोडली होती सुश्मितासाठी नोकरी
"तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हा माझा प्रियकर रजत. माझ्या आयुष्यातील खूप खास व्यक्ती. कारण, ज्यावेळी मी मिस इंडिया जिंकले आणि मला मिस युनिव्हर्ससाठीचं ट्रेनिंग घेण्यासाठी मुंबईला यावं लागलं. त्यावेळी मुंबई माझ्यासाठी एखाद्या विदेशासारखंच होतं. कारण, मी दिल्लीत लहानाची मोठी झाले. त्यामुळे मला मुंबईला जायचं नाही म्हणून मी रडायला लागले. त्यावेळी रजतने त्याची नोकरी सोडली आणि तो माझ्यासोबत मुंबईला आला", असं सुश्मिता म्हणाली.
पुढे ती म्हणते, "त्यावेळी रजत बेनेटनसाठी काम करायचा. त्याने एका महिन्यासाठी सुट्टी मागितली होती. पण, त्याला सुट्टीऐवजी थेट कामावरुन कमी केलं.मग तो माझ्यासोबत मुंबईला आला आणि सगळं ट्रेनिंग होईपर्यंत माझ्यासोबतच राहिला. जर तो नसता तर मी एक महिना सुद्धा मुंबईत राहू शकले नसते."