चक्क पडद्याच्या कापडापासून तयार झाला ड्रेस! सुश्मिता सेनच्या ‘विनिंग गाऊन’ची कथा ऐकून व्हाल थक्क !!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 11:13 AM2020-04-16T11:13:35+5:302020-04-16T11:15:03+5:30
पाहा व्हिडीओ...
पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर देणारी ग्लॅमर इंडस्ट्री कुणाला आकर्षित करत नाही? या इंडस्ट्रीचा भाग होण्यासाठी अनेक जण संघर्ष करतात. काहींच्या संघर्षाला यश येत आणि काही मात्र अनेक संघर्षानंतरही इथून आपसूक बाहेर फेकल्या जातात. आज ग्लॅमर इंडस्ट्रीतील एक अशीच स्ट्रगल स्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, मिस इंडियाचा ताज डोक्यावर मिरवणा-या सुश्मिता सेनची कथा.
1994 मध्ये सुश्मिता मिस इंडिया झाली. मात्र या स्पर्धेची तयारी करण्यापासून ही स्पर्धा जिंकण्यापर्यंत सुश्मिताला अनेक दिव्यातून जावे लागले. होय, या स्पर्धेतील ग्रँड फिनालेवेळी तिने घातलेल्या गाऊनची कथा ऐकल्यानंतर तुम्हालाही हे पटेल. सध्या सुश्मिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात ती या गाऊनची कथा सांगताना दिसतेय.
तर सुश्मिता मिस इंडियासाठी सिलेक्ट तर झाली. पण या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेसाठी आपल्याला एका महागड्या ड्रेसची गरज पडेल, हे तिला माहिती नव्हते. फक्त ही स्पर्धा जिंकायची एवढेच तिला माहित होते. अशात ऐनवेळी या स्पर्धेत प्रत्येक मॉडेलला 4 ड्रेस घालायचे आहेत, हे तिला कळले. पण या ड्रेससाठी सुश्मिताजवळ पैसे नव्हते. ब्रँडेड कपडे घेण्याची तेव्हा तरी तिची ऐपत नव्हती. अशावेळी या पठ्ठीने एक वेगळीच शक्कल लढवली. होय, मोजे आणि पडद्यांपासून तिने आपले ड्रेस तयार केलेत.
सुश्मिता सांगते, डिझायनर वा ब्रँडेड कपडे घालून स्पर्धेत उतरण्याएवढे पैसे त्यावेळी माझ्याकडे नव्हते. कारण मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होते. पण ड्रेस तर हवे होते. अशावेळी माझी आई माझ्या मदतीला धावून आली. कपडे नाही तर काय झाले, लोक कपडे बघायला थोडीच येणार आहेत. ते तर तुला बघायला येणार आहेत. चल आपण शॉपिंग करुन येऊ, असे म्हणून आई मला सरोजिनी मार्केटला घेऊन गेली आणि तिथून आम्ही लांबलचक कपडा घेऊन परत घरी आलो.
आमच्या गॅरेजजवळ एक टेलर होता. तो पेटिकोट शिवायचा. आम्ही तो कपडा घेऊन त्याच्याकडे गेलो. हे सर्व टीव्हीवर दिसणार आहे. तेव्हा चांगले कपडे शिवून द्या, असे आम्ही त्याला सांगितले. माझ्या गाऊनची डिझाईन कशी असावी, यासाठी आईने एका मॅगझिनची मदत घेतली. आई कलाकार होती तिने उरलेल्या कापडाचे गुलाब बनवून माझ्या खांद्यावर लावले. ब्लॅक कलरचे सॉक्स घेऊन ते कट करुन त्यात इलॅस्टिक घालून माझे ग्लव्स बनवण्यात आले आणि अशाप्रकारे माझा विनिंग गाऊन तयार झाला. ते कपडे घालून मी मिस इंडिया झाले. त्यावेळी मला एक गोष्ट समजली ती म्हणजे, व्यक्तीचे कपडे नाही तर विचार चांगले असणे सर्वात महत्त्वाचे असतात.