Sushmita Sen: हृदयविकाराच्या झटक्यानंतर पहिल्यांदाच समोर आली सुष्मिता सेन; रॅम्प वॉक करत जिंकलं मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 20:45 IST2023-03-11T20:41:22+5:302023-03-11T20:45:01+5:30
Sushmita Sen after heart attack: मुंबईत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये सुष्मिता सहभागी झाली होती.

Sushmita Sen: हृदयविकाराच्या झटक्यानंतर पहिल्यांदाच समोर आली सुष्मिता सेन; रॅम्प वॉक करत जिंकलं मन
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिला गेल्या काही दिवसांआधी हृदयविकाराचा झटका आला होता. सुष्मिताने स्वत: पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. मात्र या घटनेनंतर तिने पहिल्यांदाच एका कार्यक्रमात सहभाग घेतला. मुंबईत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये सुष्मिता सहभागी झाली होती.
'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये सुष्मिताने अनुश्री रेड्डीने डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. 'लॅक्मे फॅशन वीक'च्या मंचावर रॅम्प वॉक करताना सुष्मिता खूपच आनंदी दिसून आली. सुष्मिताने स्वत: रॅम्प वॉक करतानाचा व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केला आहे.
सुष्मिता सेनने हृदयविकाराचा झटका आल्यानंतर इन्स्टाग्राम लाइव्ह केले होते. या लाइव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधत तिने तब्येतीबद्दल माहिती दिली. ती अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. मात्र, हळूहळू प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे. सुष्मिताच्या घशाला इन्फेक्शनही झाले असल्याने लाइव्हमध्ये तिला बोलण्यासही त्रास जाणवत होता. सुष्मिता म्हणाली की, माझ्या घशाला इन्फेक्शन झाल्यामुळे असा आवाज येत आहे. पण काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या काही दिवसात तुम्ही माझ्याबद्दल व्यक्त केलेली काळजी आणि प्रेम पाहून मी भारावून गेली आहे. मी स्वत:ला नशीबवान समजते की तुम्ही माझ्यावर इतके प्रेम करता. मी आता बरी आहे. हळूहळू माझ्या तब्येतीत सुधारणा होत आहे, असं सुष्मिता म्हणाली होती.
दरम्यान, सुष्मिता ४७ वर्षांची आहे. फिटनेस फ्रिक म्हणून ती ओळखली जाते. सोशल मीडियावर ती रोज नवे वर्कआऊट व्हिडीओ शेअर करत असते. याऊपरही सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आला, हे वाचून अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी ती लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"