सस्पेंस, थ्रील अन् विजय-कतरिनाची अनोखी जोडी, 'मेरी ख्रिसमस'बद्दल आकर्षित करणाऱ्या 5 गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:12 PM2024-01-10T12:12:33+5:302024-01-10T12:13:48+5:30

श्रीराम राघवन यांच्या या सिनेमात काय पाहायला मिळणार?

Suspense, Thriller and Vijay Setupati Katrina kaif unique pair 5 things that appeal to Merry Christmas | सस्पेंस, थ्रील अन् विजय-कतरिनाची अनोखी जोडी, 'मेरी ख्रिसमस'बद्दल आकर्षित करणाऱ्या 5 गोष्टी

सस्पेंस, थ्रील अन् विजय-कतरिनाची अनोखी जोडी, 'मेरी ख्रिसमस'बद्दल आकर्षित करणाऱ्या 5 गोष्टी

विजय सेतुपति (Vijay Setupati) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) स्टारर 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. १२ जानेवारीला सिनेमा प्रदर्शित होतोय. ट्रेलर बघून प्रेक्षकही संभ्रमात पडले आहेत. नक्की काय कहाणी आहे हे बघण्यासाठी प्रत्येकाचीच उत्सुकता वाढली आहे. श्रीराम राघवन (Sriram Raghvan) दिग्दर्शित सिनेमांकडून नेहमीच काहीतरी हटके पाहायला मिळतं. 'अंधाधुन' सिनेमावरुन याचा अंदाज आलाच आहे. 'मेरी ख्रिसमस' सिनेमाबद्दल आकर्षित करणाऱ्या पाच गोष्टी बघुया.

अनोखी जोडी

'मेरी ख्रिसमस' मधील मुख्य अभिनेता साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपति आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.  नुकतंच त्याने शाहरुखच्या जवान मध्ये खलनायकाची भूमिका साकारली. विजय सेतुपति आणि कतरिना कैफचीही जोडी बनू शकते याची कोणी कल्पनाही केली नसेल. पण श्रीराम राघवन ही अनोखी जोडी 'मेरी ख्रिसमस' मध्ये कास्ट केली. विजयच्या अपोझिट श्रीराम राघवनने कतरिनाला कास्ट केलं आहे याचाच अर्थ सिनेमात तिची इंटरेस्टिंग भूमिका असणार यात शंका नाही. विजय सेतुपति आणि कतरिनाचा लिपलॉक सीनही सध्या व्हायरल होतोय.

कहाणी

'मेरी ख्रिसमस'चं ट्रेलर पाहून ही एक प्रेमकहाणी असल्याचं प्रथमदर्शनी जाणवतं. पण ट्रेलर पुढे सरकत गेल्यावर कळतं की यात काहीतरी वेगळं आहे. आपापल्या आयुष्यात व्यस्त असलेले विजय आणि कतरिना अचानक ख्रिसमसला एकमेकांना भेटतात आणि प्रेमाचे काही क्षणही घालवतात. पण हा श्रीराम राघवनचा सिनेमा आहे त्यामुळे या प्रेमकहाणीचा शेवट ना रोमँटिक असेल ना ट्रॅजिक. इथे नक्कीच ट्विस्ट असणार आहे. ट्रेलरमध्ये एका हत्येचा आणि अपहरणाचाही सीन आहे. हा ट्वीस्ट काय आहे हे श्रीराम राघवन यांच्या नजरेतून पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे.

डार्क ह्युमर

ज्यांनी अंधाधुन पाहिला असेल त्यांना सिनेमातील सर्वच ट्विस्ट अँड टर्न्स माहित आहेत. यातील आयुष्मानची भूमिका पाहून आपल्याला हसूही येतं आणि काहीतरी गुपित आहे हेही जाणवतं. सिनेमातील हाच प्रकार श्रीराम राघवन यांचं वेगळेपण दाखवतो. त्यांचा सिनेमा म्हणजे डार्क ह्युमरचं उत्तम उदाहरण आहे. आता 'मेरी ख्रिसमस' मध्ये विजय सेतुपतिच्या वाट्याला नक्की कशी भूमिका आहे हे कळेलच.

बॉलिवूड क्लासिक

श्रीराम राघवनच्या सिनेमातून नेहमी बॉलिवूड क्लासिकची आठवण येते. त्यांचा कोणताही सिनेमा घ्या  यातील गाणी, सीन्स बॉलिवूड क्लासिकचं दर्शन घडवतात. श्रीराम राघवन पक्के बॉलिवूडकर आणि फिल्मी आहेत. त्यांच्या सिनेमातील रहस्याचा उलगडा शेवटपर्यंत होत नाही. खरे चाहतेच तो उलगडा करु शकतात. 'मेरी ख्रिसमस'कडूनही त्याच अपेक्षा आहेत. 

सरप्राईज

श्रीराम राघवन यांचा सिनेमा पाहिल्यानंतर थिएटरमधून बाहेर आल्यानंतर इतरांसोबत चर्चा होणार हे कन्फर्मच असतं. ते आपल्या सिनेमात असं काही क्रिएट करतात ज्यामुळे प्रेक्षक संभ्रमात पडतात. एकीकडे त्यांचा सिनेमा सुरु असतो दुसरीकडे तुम्ही डोकं लावत असता की नक्की झालं काय. असं सरप्राईज 'मेरी ख्रिसमस' मध्येही पाहायला मिळेल  अशी शक्यता आहे. 

Web Title: Suspense, Thriller and Vijay Setupati Katrina kaif unique pair 5 things that appeal to Merry Christmas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.