हृतिकबरोबरच्या घटस्फोटावर १० वर्षांनी सुजैनच्या भावाने सोडलं मौन, म्हणतो- "मुंबईत लग्न टिकणं कठीण, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 02:27 PM2024-09-18T14:27:43+5:302024-09-18T14:28:16+5:30
हृतिकबरोबरच्या घटस्फोटानंतर १० वर्षांनी सुजैनच्या भावाने मौन सोडत याबाबत भाष्य केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन अभिनयातील करिअरप्रमाणेच त्याच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो. हृतिक आणि सुजैन २०१४ मध्ये घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. २००० मध्ये हृतिक आणि सुजैनने लग्नगाठ बांधली होती. सुखी संसारानंतर १४ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे चाहत्यांना धक्का बसला होता. आता हृतिकबरोबरच्या घटस्फोटानंतर १० वर्षांनी सुजैनच्या भावाने मौन सोडत याबाबत भाष्य केलं आहे.
सुजैनचा भाऊ जायद खानने नुकतीच सुभोजित घोषच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने बहिणीचा घटस्फोट आणि हृतिक रोशनबरोबरच्या नात्यावरही भाष्य केलं. तो म्हणाला, "मुंबईमध्ये लग्न टिकणं कठीण आहे. आमचं कुटुंब मॉर्डन आहे. जर दोन व्यक्ती एकमेकांबरोबर राहू इच्छित नसतील. तर त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. कुटुंब, मुलं या सगळ्या गोष्टी आहेत. आमच्या कुटुंबात प्रत्येकाचा आदर केला जातो. आमच्या मुलांनाही आम्ही हीच शिकवण दिली आहे".
"काहीही झालं तरी कोणत्या एका व्यक्तीची बाजू घेऊन आम्ही दुसऱ्याबद्दल वाईट बोलत नाही. आपण एकत्र आनंदी राहू शकतो किंवा दु:खी...मग तुम्ही कोणता पर्याय निवडाल? माझं हृतिकबरोबरही चांगलं रिलेशन आहे. त्याचं हृदय हे सोन्यासारखं आहे. त्याची पार्टनर सबा एक चांगली व्यक्ती आहे. अर्सलान देखील एक चांगला मुलगा आहे. आयुष्य पुढे सरकत राहतं", असंही त्याने सांगितलं.
घटस्फोटानंतर झालेल्या ट्रोलिंगबाबतही त्याने भाष्य केलं. तो म्हणाला, "तुमचं कुटुंब या काळात तुमच्याबरोबर कसं उभं राहतं ते महत्त्वाचं आहे. आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीबरोबर घडणारी गोष्ट ही घरातील प्रत्येकाबरोबर घडत असते. हे कोणाबरोबरही घडू शकतं. आपण एका अशा शहरात राहतो जिथे अनेक डिस्ट्रॅक्शन्स आहेत. इथे लग्न टिकणं फार कठीण आहे".