स्वरा भास्कर रिहानावर भाळली; ‘तुकडे तुकडे गँग’ची इंटरनॅशनल सदस्य म्हणाली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 01:38 PM2021-02-11T13:38:24+5:302021-02-11T13:40:14+5:30
स्वराने चक्क रिहानाला स्वत:च्या गँगमध्येच सामील करून घेतलेय. इतकेच नाही तर तिला मनोमन बहीण मानले आहे.
सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह राहणारी आणि परखड मते मांडणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सतत या ना त्या कारणाने चर्चेत आहे. अनेकदा ती ट्रोलही होते. पण पर्वा करतेय कोण? आता काय तर, स्वरा हॉलिवूड पॉप सिंगर रिहानाच्या प्रेमात पडलीये. मग काय, तिने चक्क रिहानाला स्वत:च्या गँगमध्येच सामील करून घेतलेय. इतकेच नाही तर तिला मनोमन बहीण मानले आहे.
रिहाना कोण हे आम्हाला सांगण्याची गरज नाहीच. भारतातील शेतकरी आंदोलनावर ट्वीट करून रिहाना जगभर चर्चेत आली होती. गेल्या काही दिवसांपासून आपल्या या ट्वीटमुळे ती सतत प्रकाशझोतात आहे. आता स्वराने रिहानाला पाठींबा दिला आहे.
Shooting day.. this pic is dedicated to latest international member of ‘tukde tukde gang’ .. Behen @rihanna ! 🙏🏽🙏🏽🙏🏽 pic.twitter.com/quWMc3zOH0
— Swara Bhasker (@ReallySwara) February 10, 2021
स्वराने आपल्या शूटींग सेटवरच्या कॉफी मगचा फोटो शेअर करत, रिहानाला बहीण म्हटले आहे. ‘शूटींग डे... हा फोटो इंटरनॅशनल ‘तुकडे तुकडे गँग’ची सर्वात नवीन सदस्य रिहानाला समर्पित... बहन रिहाना,’असे ट्वीट स्वराने केले. तिच्या या ट्वीटने लगेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्वराने शेअर केलेल्या फोटोत कॉफी मग दिसतोय. त्यावर वर्क वर्क वर्क... असे लिहिलेले आहे.
भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहानाने ट्वीट केले केल्यानंतर तिच्या ट्वीटने अख्खा देश ढवळून निघाला होता. आपण यावर बोलत का नाही? असा सवाल करत रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा देताच, भारतातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा जगभर चर्चेत आला होता. रिहानाच्या या ट्वीटवर भारतात वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया दिल्या होत्या. शेतकरी आंदोलनाकडे लक्ष वेधणा-या रिहानाचे काहींनी भरभरून कौतुक केले तर काहींनी आमच्या अंतर्गत मुद्यांत नाक खुपसू नको, अशा शब्दांत रिहानाला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला होत्या. कंगना राणौतने रिहानाला मूर्ख म्हणत तिच्यावर बोचरी टीका केली होती. रिहानाच्या जगभर चर्चेत आलेल्या ट्वीटवर बॉलिवूडचे सेलिब्रिटीही वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झाले होते. अक्षय कुमारपासून करण जोहर, अजय देवगण, सुनील शेट्टीपर्यंत अनेकांनी सरकारचे समर्थन करत, रिहानाला अप्रत्यक्षपणे फटकारले होते.