"प्रोपगंडा नाही तर...", स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान रणदीप हुड्डा थेटच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 01:05 PM2024-03-05T13:05:52+5:302024-03-06T21:32:52+5:30
विशेष म्हणजे याच सिनेमातून तो दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे.
अभिनेता रणदीप हुड्डा 'स्वातंत्र वीर सावरकर' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात रणदीप हा वीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे याच सिनेमातून तो दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. त्यामुळे हा चित्रपट त्याच्यासाठी खास आहे. सोमवारी सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना रणदीपने वीर सावरकरांबद्दल पसरवलेल्या चुकीच्या गोष्टींवर अत्यंत परखडपणे भाष्य करणार हा सिनेमा असल्याचं सांगितलं.
'स्वातंत्र वीर सावरकर' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी रणदीपने सावरकरांना धाडसी म्हटलं. तसेच हा सिनेमा एक प्रोपगंडा नसून सावरकरांविरोधात पसरवलेल्या अप्रचाराला प्रत्युत्तर देणारी फिल्म असल्याचं त्यानं सांगितलं. तो म्हणाला, सावरकर हे माफीवीर अजिबात नव्हते. त्यांनीच नव्हे तर त्याकाळात इतरही बऱ्याच कैद्यांनी दयेचा अर्ज केलेला होता. याविषयी मी सिनेमात अत्यंत विस्तृतपणे भाष्य केलं आहे'.
पुढे तो म्हणाला, 'त्यावेळी जामीनासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. हा कोणत्याही कैद्याचा हक्क आहे. जर कोणी न्यायालयात गेले असेल तर त्यांना कळेल की कोर्टात गोष्टी कशा चालतात. सावरकर हे सेल्युलर जेलमध्ये होते आणि तेथून त्यांना बाहेर पडायचं होतं. त्यांना देशासाठी सांस्कृतिक आणि राजकीय योगदान द्यायचं होतं. त्यांनी केलेले काम या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातून सावरकरांबद्दल लोकांना कळेल, असे त्याने सांगितलं.
रणदीप म्हणाला, 'महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू आणि इतर अनेक व्यक्तिमत्त्वांवर चित्रपट बनले आहेत. अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्यावर आधारित 'ओपेनहायमर' हा चित्रपट हॉलिवूडमध्ये बनवण्यात आला आहे. आपल्या देशात आपण आपल्याच लढवय्यांवर प्रश्न उपस्थित करत आहोत'.
येत्या २२ मार्च ला 'स्वतंत्र वीर सावरकर' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुरुवातील चित्रपटाच्या दिग्दर्शनाची कमान महेश मांजरेकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती, परंतु त्यांनी स्वतःला चित्रपटापासून दूर केलं.अशा परिस्थितीत रणदीपने अभिनयासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारीही स्वीकारली.या चित्रपटात रणदीपशिवाय अमित सियाल आणि अंकिता लोखंडे देखील दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदीसह मराठी भाषेतही ते पाहता येईल.