'दिलरुबा' आता 'गांधारी', नव्या वर्षात नव्या दमाचा चित्रपट घेऊन येतेय तापसी पन्नू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:25 IST2025-01-23T14:24:38+5:302025-01-23T14:25:34+5:30
वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी तापसी ओळखली जाते. आता असाच एक चित्रपट ती घेऊन येत आहे.

'दिलरुबा' आता 'गांधारी', नव्या वर्षात नव्या दमाचा चित्रपट घेऊन येतेय तापसी पन्नू
Taapsee Pannu: बॉलीवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत की, जे त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. या कलाकारांमध्ये तापसी पन्नूचे नाव घेतले जाते. तापसीने आपला वेगळा प्रेक्षकवर्ग तयार करण्यात यश मिळवले आहे. तापसीने स्वबळावर आपले सिनेमे यशस्वी करून दाखवले आहेत. अलिकडेट ओटीटीवर रिलीज झालेल्या तिच्या 'हसीन दिलरुबा' आणि 'फिर आई हसीन दिलरुबा'ला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. हिच प्रेक्षकांची लाडकी दिलरुबा आता 'गांधारी' (Gandhari) बनली आहे.
तापसी पन्नू नव्या वर्षात नव्या दमाचा चित्रपट घेऊन येतेय. कनिका धिल्लन लिखित आणि निर्मित या चित्रपटातील 'गांधारी' महाभारत काळातील नाही, तर आधुनिक काळातील आहे. या अॅक्शन थ्रिलरपटात थरारक सूडकथा पाहायला मिळणार आहे. तापसीचा हा चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. यात तिच्या जाडीला 'पाताल लोक' फेम इश्वाक सिंग दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तापसी आणि इश्वाक प्रथमच एकत्र काम करत आहेत. डिसेंबरमध्ये पहिले शूटिंग शेड्यूल संपलेल्या या चित्रपटाचे सध्या दूसरे शूटिंग शेड्यूल सुरू आहे.
अलिकडेच तापसीनं इन्स्टाग्रामवर गांधारीच्या सेटवरील काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तापसी कॅमेऱ्याकडे पाठ करून दिसत आहे. तिने लांब स्कर्ट आणि लाल शर्ट घातलेला आहे. तर तिचे केस रिबनने बांधलेले आहेत. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, " हे देवा... माझी विनंती मान्य कर... जेणेकरून मी कधीही चांगले काम करण्यापासून विचलित होणार नाही. मी युद्धात जाताना शत्रूची भीती बाळगणार नाही. दृढनिश्चयाने मी विजयी होईन. मी माझ्या मनाला फक्त तुझे गुणगान गाण्यास शिकवू शकेन आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा मी युद्धाच्या मैदानावर वीरतेने लढत मरावे".
'गांधारी' या चित्रपटाच्या माध्यमातून तापसी पन्नू आणि कनिका ढिल्लन पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. याआधी तापसी आणि कनिका यांनी रश्मी रॉकेट, मनमर्जियां, हसीन दिलरुबा आणि नंतर हसीन दिलरुबामध्ये एकत्र काम केलं होतं. गांधारी हा त्यांचा एकत्र पाचवा चित्रपट असेल. चित्रपटाची रिलीज डेट आणि इतर स्टारकास्ट अद्याप जाहीर झालेली नाहीत. पण, चाहत्यांना मात्र या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.