वडिलांसोबत पहाटे ३ ते ६ पर्यंत रियाज करायचे झाकीर हुसेन, तीन पद्म पुरस्कार ते पाच ग्रॅमी पुरस्कारनं गौरव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 09:46 IST2024-12-16T09:45:37+5:302024-12-16T09:46:46+5:30

तबला आणि झाकीर हे एकमेकांसाठी बनवले गेले होते. झाकिर हुसैन यांनी कधीच तबल्याची साथ सोडली नाही.

Tabla Maestro Zakir Hussain Passed Away Know Grammy To Padma Vibhushan Awards List He Won | वडिलांसोबत पहाटे ३ ते ६ पर्यंत रियाज करायचे झाकीर हुसेन, तीन पद्म पुरस्कार ते पाच ग्रॅमी पुरस्कारनं गौरव!

वडिलांसोबत पहाटे ३ ते ६ पर्यंत रियाज करायचे झाकीर हुसेन, तीन पद्म पुरस्कार ते पाच ग्रॅमी पुरस्कारनं गौरव!

Zakir Hussain : तबल्याच्या तालावर सर्वांना मंत्रमुग्ध करणारे उस्ताद गेले.  प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन (Ustad Zakir Hussain) यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात झाकीर हुसेन यांच्यावर उपचार सुरु होते. झाकीर हुसेन यांना हृदयविकाराचा त्रास होता. पण अखेरीस त्यांची झुंज अपयशी ठरली आणि झाकीर हुसेन यांची प्राणज्योत मालवली.   पहिल्या आंतरराष्ट्रीय मैफिलीत केवळ 5 रुपये कमावण्यापासून ते पाच ग्रॅमी आणि तिन पद्म पुरस्कार जिंकून प्रसिद्ध उस्ताद बनण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास डोळे दिपावणारा आहे. 

भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकारांपैकी एक. तबलावादक म्हणून जगभर प्रसिद्धी मिळवलेले झाकीर हुसेन यांना भारत सरकारने 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत 5 ग्रॅमी पुरस्कार (Zakir Hussain Grammy Awards) जिंकले आहेत.  विशेष म्हणजे ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी झाकीर हुसेन यांना बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं. व्हाईट हाऊसच्या कॉन्सर्टसाठी आमंत्रित केलेले ते पहिले भारतीय संगीतकार आहेत. तर 2006 साली झाकीर हुसेन यांचा मध्य प्रदेश सरकारकडून "कालिदास पुरस्कार"ने गौरव झाला. तर 2012 साली कोणार्क नाट्य मंडपतर्फे त्यांना "गुरु गंगाधर प्रधान" लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला. याशिवाय,  संगीत नाट्य अकादमीतर्फे "अकादमी रत्न पुरस्कार"ही त्यांना मिळालेला आहे. तर मुंबई विद्यापीठातर्फे त्यांना "डॉक्टर ऑफ लॉ" ही मानद पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. 

9 मार्च 1951 रोजी जन्मलेले झाकीर हुसैन हे उस्ताद अल्ला राख यांचे पुत्र. तर आईचे नाव बीवी बेगम होते. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तबल्याचे धडे गिरवले. आपल्या वडिलांसोबत ते पहाटे 3 ते 6 पर्यंत रियाज करायचे. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला. येथून त्यांनी कलाक्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला अल्बम 'लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड' 1973 मध्ये आला होता. यानंतर त्यांनी आपल्या कला आणि प्रतिभेच्या जोरावर जगभरात नाव कमावले. तबला आणि झाकीर हे एकमेकांसाठी बनवले गेले होते. झाकिर हुसैन यांनी कधीच तबल्याची साथ सोडली नाही.

झाकीर हुसेन यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झालं. तर मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं. झाकीर हुसेन यांनीही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये 'हीट अँड डस्ट' या ब्रिटिश चित्रपटाचा समावेश आहे. 1998 मध्ये आलेल्या 'साज' या बॉलिवूड चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं. मुघल-ए-आझम या चित्रपटात सलीमच्या धाकट्या भावाच्या भूमिकेची ऑफर झाकीर हुसेन यांनाही देण्यात आली होती. पण,  त्यावेळी त्यांच्या वडिलांनी ते मान्य केले नाही. आपल्या मुलाने फक्त संगीतावर लक्ष केंद्रित करावे अशी त्यांची इच्छा होती. 

Web Title: Tabla Maestro Zakir Hussain Passed Away Know Grammy To Padma Vibhushan Awards List He Won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.