अभिनेत्याच्या भावाने कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 06:27 PM2020-03-06T18:27:35+5:302020-03-06T18:27:52+5:30
या अभिनेत्याच्या भावाने राहात्या घरी विष प्राशन करून त्याचे आयुष्य संपवले.
दाक्षिणात्य अभिनेते आणि प्रसिद्ध राजकारणी आनंदराज यांच्या भावाने नुकतीच आत्महत्या केली आहे. त्यांचा भाऊ कनागासाबाई यांच्यावर अनेक कोटींचे कर्ज होते. कर्जामुळे त्यांचा भाऊ गेल्या काही दिवसांपासून खूपच टेन्शनमध्ये आला होता. याच टेन्शनमुळे त्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज लावला जात आहे. त्याने राहात्या घरी विष प्राशन करून त्याचे आयुष्य संपवले.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कनागासाबाई यांनी सकाळी घराचा दरवाजा न उघडल्यामुळे काही अघटीत घडले असल्याचा संशय सगळ्यांना आला होता. त्यामुळे शेजारच्या लोकांनी पोलिसांना कळवले. घराचा दरवाजा उघडला असता त्यांचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यांना गेल्या काही महिन्यांपूर्वी 50 कोटींचे नुकसान झाल्यामुळे ते चांगलेच टेन्शनमध्ये आले होते. त्यांनी पाच मार्चला विष प्राशन करत पाँडेचरी येथील त्यांच्या घरात आत्महत्या केली.
कनागासाबाई यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलिसांनी या प्रकरणावर काहीही न बोलणेच पसंत केले आहे. कनागासाबाई यांचा भाऊ आनंदराज हे दाक्षिणात्य चित्रपटातील खूप प्रसिद्ध नाव असून त्यांनी तेलगू, कन्नड, मल्याळम यांसारख्या अनेक भाषांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी विजयची मुख्य भूमिका असलेल्या बिजिल या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटानंतर ते अभिनयक्षेत्रापासून दूर आहेत.