Tanushree Dutta Controversy: तनुश्री दत्ता या कारणामुळे काही दिवस राहाणार मीडियापासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 17:33 IST2018-10-02T17:32:17+5:302018-10-02T17:33:02+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून तनुश्री दत्ता मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडत आहे. पण आता तिने काही दिवस मीडियापासून दूर राहायचे ठरवले आहे.

Tanushree Dutta Controversy: तनुश्री दत्ता या कारणामुळे काही दिवस राहाणार मीडियापासून दूर
२००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या सेटवर अभिनेता नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा सनसनाटी आणि धक्कादायक गौप्यस्फोट तनुश्री दत्ताने काही दिवसांपूर्वी केला आहे. या सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरू असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. कोरियोग्राफरला दूर सारत डान्स स्टेप्स कशा कराव्यात दाखवण्याचा अट्टाहास नाना करत होते अशी आठवण तिने सांगितली आहे. एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने हे सांगितले आहे. कॉन्ट्रॅक्टनुसार ते गाणं सोलो होतं. मात्र नाना पाटेकरांना आपल्यासोबत इंटिमेट सीन करायचा होता असा गंभीर आरोपही तिने केला आहे.
या सगळ्या प्रकारामुळे ते गाणं न करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. हा प्रकार आठवला की आजही दचकते असंही तिने म्हटले होते. या प्रकरणानंतर तनुश्री सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडत आहे. पण आता तिने काही दिवस मीडियापासून दूर राहायचे ठरवले आहे. तिने प्रसारमाध्यमांना नुकतेच आवेदन देऊन सांगितले आहे की, या प्रकरणामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. या साऱ्या धावपळीमुळे माझी प्रकृती बिघडली असून माझ्या घशाला सूज आली आहे. त्यामुळे मला नीट बोलताही येत नाही. या कारणामुळेच मी आता विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला अशा वातावरणाची सवय नाहीये. गेल्या आठ वर्षांपासून मी अध्यात्माच्या मार्गावर चालत आहे. त्यामुळे सध्या जे वातावरण निर्माण झालं आहे. त्याचा मला मानसिक त्रास होत आहे. मला आता शांततेने जीवन जगायचं आहे. आता मला मानसिक शांतीसोबतच शारीरिक आरामाचीही गरज आहे. पण मी ही लढाई जिंकेन. काही दिवसांतच मी परत येईन आणि ही लढाई लढेन.
तनुश्री काही दिवस मीडियापासून दूर राहाणार असल्याचे तिने नुकत्याच दिलेल्या या वक्तव्यावरून कळून येत आहे. या वादाचे आता पुढे काय होते हे पुढील काहीच दिवसांत कळेल.