"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 11:43 AM2024-05-16T11:43:28+5:302024-05-16T11:46:04+5:30
तन्वी आजमी म्हणाल्या, 'माझा स्वभाव विद्रोही'
तन्वी आजमी (Tanvi Azmi) या हिंदी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. सिनेमा, नाटक, वेबसीरिजमध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे. त्यांना ऑनस्क्रीन पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. रणवीर सिंहच्या 'बाजीराव मस्तानी'सिनेमात त्यांनी त्याच्या आईची भूमिका साकारली जी सगळ्यांच्याच लक्षात राहिली. सध्या त्या 'दिल दोस्ती डिलेमा' या प्राईमवरील वेबसीरिजमुळे चर्चेत आहेत. सीरिजच्या प्रमोशनवेळी दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला.
'दिल दोस्ती डिलेमा' मध्ये अनुष्का सेन मुख्य भूमिकेत आहे. तर तन्वी आजमी यांनी तिच्या आजीची भूमिका साकारली आहे. आजी आणि नातीमधला जनरेशन गॅप या सीरिजमधून दाखवण्यात आला आहे. नुकतंच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत तन्वी आजमी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी कधी आयुष्यात बंडखोरी केली आहे का? यावर त्या आठवण सांगत म्हणाल्या,"मी खूप गुणी आणि आज्ञा पाळणारी मुलगी होते. पण नंतर असं काही झालं की माझ्यात विद्रोह निर्माण झाला. पण माझा तो सुप्त स्वभाव होता. मग एक क्षण असा आला की मी बंडखोरी केलीच. ती कशी तर मी एका मुस्लिम मुलाशी लग्न केलं. मला असं वाटलं की अख्ख्या मुंबईचा आता उद्रेक झाला आहे कारण एका महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबातील मुलीने मुस्लिम मुलाशी लग्न केलं. अनेकांसाठी जग संपल्याचाच तो क्षण होता. माझ्यासाठी तो क्षण माझा विद्रोही स्वभाव दाखवणारा होता आणि नंतर माझ्यात विद्रोह कायम राहिला."
त्या पुढे म्हणाल्या,"मी जॉईंट फॅमिलीत वाढले आहे. त्यामुळे सभोवताली सतत माणसं असणं काय असतं ती भावना मला माहित आहे. सीरिजमध्ये काम करतानाही मला तसंच वाटलं. मला माझ्या आजोबांची खूप आठवण येते. त्यांनी माझे कायम लाड केले आणि त्यांच्यामुळेच मला कळलं की एका पुरुषाने महिलांसोबत कसं वागलं पाहिजे. मी त्यांची खूपच लाडकी होते. वयाच्या ८ व्या वर्षापर्यंत ते मला उचलून घ्यायचे. आजी आजोबांसोबत राहणं काय असतं याचा अनुभव ही सीरिज देते जो अनुभव आजकालच्या मुलांना येत नाही. विशेषत: शहरात वाढणाऱ्या मुलांना त्यांचे आईवडील आजीआजोबांकडे पाठवतच नाहीत."
"डिजीटल जगामुळे मुलांचं फार नुकसान होतंय. त्यांना साधं बोलणंही जमत नाही. मोबाईलमुळे अख्खं जग त्यांच्या हातात आलंय. पण एक दिवस हे सगळं सोशल मीडिया गायब झालं तर ही मुलं काय करणार आहेत? लहान मुलांनी दर रविवारी एक तरी रोप लावलं पाहिजे, रस्ते स्वच्छ केले पाहिजेत, शारीरिक हालचाल झाली पाहिजे पण असं काहीच आता दिसत नाही." असंही त्या म्हणाल्या.
तन्वी आजमी या शबाना आजमी यांच्या वहिनी आणि कैफी आजमी यांच्या सून आहेत. त्यांनी सिनेमॅटोग्राफर बाबा आजमी यांच्याशी लग्न केलं होतं.