अन् तापसी पन्नूने निर्मात्यांना आणले वठणीवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 09:18 PM2018-07-09T21:18:13+5:302018-07-09T21:20:23+5:30
अभिनेत्री तापसी पन्नूने फार कमी वेळात आपली स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे. पण आजही बड्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यासाठी तापसीला संघर्ष करावा लागतो.
अभिनेत्री तापसी पन्नूने फार कमी वेळात आपली स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे. अभिनयाच्या बाबतीत तापसी एक खणखणीत नाणं आहे. आपल्या अनेक चित्रपटातून तिने ते सिद्ध केले आहे. पण आजही बड्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यासाठी तापसीला संघर्ष करावा लागतो. आजही मानधनाच्या मुद्यावर तापसीला घासाघीस करावी लागते. तुम्हाला कदाचित हे खरे वाटणार नाही. पण हे खरे आहे. होय, अलीकडे एका मुलाखतीत तापसी यावर बोलली.
माझ्याकडे कुठलाही चित्रपट येवो, त्याचे निर्माते माझ्याकडे येतात आणि इथून तिथून सगळेच एका सूरात बोलायला लागतात. बघ, तापसी आमचा चित्रपट फार कमर्शिअल नाही. आमच्याकडे तितके पैसे नाहीत. हा एक एक्सपेरिमेंट चित्रपट आहे. आमचा बजेट खूप कमी आहे. थोडं मॅनेज कर, थोडं समजून घे, असे हे निर्माते मला म्हणतात. मी यावर काय बोलणार? माझ्याकडे एक्सपेरिमेंटल चित्रपटाच्याच आॅफर येतात, असे मी त्यांना म्हणते. पण हे निर्माते त्यांचा हट्ट सोडायला तयार नसतात. खरे तर माझ्याकडे टिपिकल चित्रपट येतचं नाहीत. येतात ते एक्सपेरिमेंटल चित्रपट. मग अशा प्रत्येक चित्रपटासाठी मी माझी फी कमी करत राहिले तर मी कमावणार काय? समजा ‘वन्स इन ब्लू मून’ एखादा कमर्शिअल चित्रपट आलाच तर या चित्रपटांच्या निर्मात्यांंचाही युक्तिवाद ठरलेला असतो. फूल कमर्शिअल फिल्म हा तुझा जॉनर नाही. तू याला सरावलेली नाहीस. आम्ही तुला इतके पैसे देऊ शकत नाही, असे ते मला म्हणतात. म्हणजे, कमर्शिअल असो की आऊट आॅफ बॉक्स फिल्म प्रत्येक चित्रपटाच्या निर्मात्यांना माझ्याकडून कमी पैशात काम काढून घ्यायचे असते. हे असेच सुरू राहिल तर माझ्या घरची चूल पेटायची कशी? हाच विचार करून शेवटी मी एक निर्णय घेतला आणि थोड्याच दिवसांत या निर्णयाचे सकारात्मक फायदे मला दिसू लागलेत. आता काहीही होवो, एक पैसाही कमी करायचा नाही, हा तो निर्णय होता. गेल्या पाच सहा महिन्यांपासून मी माझ्या मानधनाचा एक पैसाही कमी करत नाही. शेवटी मलाही माझ्या घराची चूल पेटवायची आहे. कदाचित आता निर्मात्यांनाही माझी ही गोष्ट पटली आहे, असे तापसी म्हणाली.
एकंदर काय तर या ना त्याप्रकारे तापसीने निर्मात्यांना वठणीवर आणले.