अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच तारा सुतारियाने सोडले मौन, दिले हे सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 06:00 AM2019-11-15T06:00:00+5:302019-11-15T06:00:02+5:30
अफेअरच्या चर्चांवर तारा सुतारियाचे म्हणणे काय आहे हे तिने लोकमतशी बोलताना नुकतेच सांगितले.
तारा सुतारियाने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता मारजावाँ या चित्रपटात ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या भूमिकेविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा...
स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटानंतर तू आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेस, या भूमिकेविषयी काय सांगशील?
मरजावाँ या चित्रपटासाठी मिलाप सरांनी मला भेटायला बोलावले होते. या भेटीत मला त्यांनी चित्रपटाचे कथानक ऐकवले. ही कथा इतकी सुंदर होती की ती ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले होते. या चित्रपटाची कथा खूप वेगळी असून या चित्रपटात मी एका मुक्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाचे चित्रीकरण करत असतानाच या चित्रपटाची मला ऑफर आली होती. त्यामुळे माझा पहिला चित्रपट प्रदर्शित व्हायच्याआधीच मला आणखी एका चांगल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
या चित्रपटासाठी तू साईन लँग्वेज शिकली आहेस, हे खरे आहे का?
या चित्रपटात मी मुक्या मुलीच्या भूमिकेत असल्याने मला या चित्रपटासाठी साईन लँग्वेज शिकणे गरजेचे होते. त्यामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणाच्याआधी माझे काही वर्कशॉप घेण्यात आले होते. स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना माझे हे वर्कशॉप सुरू झाले होते. त्यामुळे मी चित्रपटाचे चित्रीकरण आटोपल्यानंतर घरी आल्यानंतर ही भाषा शिकायचे आणि सकाळी पुन्हा चित्रीकरणाला जायचे. स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाच्या माझ्या भूमिकेपेक्षा या चित्रपटातील भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. माझ्या दुसऱ्याच चित्रपटात मला इतकी चांगली भूमिका साकारायला मिळतेय याचा मला आनंद होत आहे. मरजावाँ या चित्रपटातील सगळेच कलाकार माझ्यापेक्षा प्रचंड सिनियर आहेत. पण त्यांनी कधीच मी नवीन अभिनेत्री असल्याचे मला जाणवून दिले नाही. त्यांच्या सगळ्यांकडून मला खूप काही शिकायला मिळाले.
तू एक बालकलाकार म्हणून तुझ्या कारकिर्दीची सुरुवात केली होतीस, खूपच कमी बालकारांना चित्रपटसृष्टीत नायक-नायिका म्हणून पदार्पण केल्यानंतर यश मिळते. तुला याविषयी काय वाटतं?
मी लहान असल्यापासून गायन आणि नृत्य शिकले आहे. बालवयात तुम्ही अभिनय केले असेल अथवा यांसारख्या काही कला तुम्हाला अवगत असल्या तर एक अभिनेत्री म्हणून याचा तुम्हाला प्रचंड फायदा होतो. मी कॉलेजमध्ये असताना देखील रंगभूमीवर काम करत होती. त्यामुळे मी अभिनयाशी कधीच संबंध तोडला नव्हता. याच गोष्टीचा मला नायिका बनताना फायदा झाला.
बॉलिवूडमध्ये अफेअरच्या चर्चा रंगणे यात काही नवीन नाही. तुझे देखील नाव अनेकांसोबत जोडले गेले आहे. या सगळ्या गोष्टींना तू कशाप्रकारे तोंड देते?
खरे सांगू तर सुरुवातीला मला या गोष्टींचा त्रास होत होता. पण आता अफेअरच्या चर्चांकडे मी लक्ष देत नाही. माझे पालक माझे फ्रेंड्स आहत. त्यामुळे ते देखील याकडे दुर्लक्ष करतात. केवळ या चर्चा ऐकून ते दोघेही हसतात. एक मुलगा आणि मुलगी फ्रेंड्स असू शकत नाहीत का हा विचार लोक करत नाहीत हे मला चुकीचे वाटते. पण बॉलिवूडमध्ये असताना अशा चर्चा होत असतातच. त्याकडे दुर्लक्ष करणे हेच सगळ्याच चांगले असे मला वाटते.