ए.आर. रहमानच्या मुलीला पाहिले की माझा जीव गुदमरतो...; तस्लिमा नसरीन यांचे ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 10:26 AM2020-02-12T10:26:06+5:302020-02-12T10:27:00+5:30
तस्लिमा नसरीन यांनी का केले असे ट्वीट?
आॅस्कर विजेता, प्रसिध्द संगीतकार ए. आर. रहमान मध्यंतरी सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. याचे कारण होते, रहमानने सोशल मीडियावर शेअर केलेला कुटुंबाचा फोटो. या फोटोवरून रहमान सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आला होता. या फोटोत रहमानच्या दोन्ही मुली रहिमा व खतीजा तसेच पत्नी सायरा अशा तिघी होत्या. या फोटोत रहमानची मुलगी खतीजाने बुरखा घातला होता. रहमानच्या मुलीने बुरखा घातलेला पाहून अनेकांनी त्याला ट्रोल केले होते. आता बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी खतीजाच्या बुरख्यावर निशाणा साधला आहे.
होय, तस्लिमा यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यांचे हे ट्वीट सध्या व्हायरल होतेय. ‘मला ए. आर. रहमानचे संगीत आवडते. पण जेव्हा केव्हा मी त्याच्या मुलीला बुरख्यात बघते, तेव्हा माझा श्वास गुदमरतो. सुसंस्कृत कुटुंबातील एका शिकलेल्या महिलेचेही किती सहजपणे बे्रनवॉश केले जाऊ शकते, हे बघणे खरोखरच निराशाजनक आहे,’ असे ट्वीट तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.
I absolutely love A R Rahman's music. But whenever i see his dear daughter, i feel suffocated. It is really depressing to learn that even educated women in a cultural family can get brainwashed very easily! pic.twitter.com/73WoX0Q0n9
— taslima nasreen (@taslimanasreen) February 11, 2020
खतीजाने ट्रोलर्सला दिले होते सडेतोड उत्तर
याआधी लोकांनी खतीजाला बुरख्यावरून ट्रोल केल्यानंतर तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले होते. ‘माझ्यामुळे माझ्या वडिलांची चर्चा होते. एवढ्या सगळ्या प्रतिक्रियांची अपेक्षाही मी केली नव्हती. काही कमेंटमध्ये चक्क माझ्या कपड्यांवरुन माझ्या वडिलांना लक्ष्य करण्यात आलेय. त्यांनीच मला असे कपडे बंधनकारक केले, ते दुटप्पी आहेत, असे काय काय लोक म्हणत आहेत. मला एवढेच सांगायचे आहे की मी जे कपडे परिधान करते किंवा निवडते त्याचा माझ्या आई-वडिलांशी काडीचाही संबंध नाही. प्रत्येकाला आपले कपडे निवडण्याचा आपल्या मनाप्रमाणे राहण्याचा अधिकार आहे. आणि मी तेच करत आहे. त्यामुळे कृपया परिस्थिती जाणून घेण्याआधीच आपले निष्कर्ष काढू नका,’ असे खतीजाने म्हटले होते.