"मुंबई जुनी झाली, हैदराबादला शिफ्ट व्हा" तेलंगणाच्या मंत्र्यांनी रणबीर कपूरसमोर केलं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 03:39 PM2023-11-28T15:39:20+5:302023-11-28T15:43:32+5:30
मंत्री म्हणाले, रणबीर, 'तुम्हालाही एका वर्षात हैदराबादला शिफ्ट व्हावं लागेल.'
आगामी हिंदी चित्रपट Animal ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंसाचार, रक्तपात, रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओलचा (Bobby Deol) खतरनाक लूक यामुळे सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली आहे. नुकतंच हैदराबादमध्ये सिनेमाच्या प्रमोशननिमित्त इव्हेंट आयोजित केला गेला. या इव्हेंटला महेश बाबू, राजामौली यांनीही हजेरी लावली. यावेळी तेलंगणाचेमंत्री मल्ला रेड्डी (Malla Reddy) यांचं स्टेजवरील एक वक्तव्य खूपच चर्चेत आलं आहे.
Animal प्रमोशनल इव्हेंटमध्ये अनेक सेलिब्रिटींसोबत चाहतेही सामील झाले. यावेळी बीआरएस नेता आणि मंत्री मल्ला रेड्डी म्हणाले, 'रणबीरजी, तुम्हाला एक सांगतो, येणाऱ्या पाच वर्षात तेलुगू लोक पूर्ण हिंदुस्तान आणि बॉलिवूड-हॉलिवूडवरही अधिराज्य गाजवतील. रणबीर,तुम्हालाही एका वर्षात हैदराबादला शिफ्ट व्हावं लागेल. कारण आता मुंबई जुनी झाली. बंगळुरुत ट्रॅफिक जाम आहे. हिंदुस्तानात एकच शहर आहे ते म्हणजे हैदराबाद.' तसंच ते पुढे म्हणाले,'रणबीर तुमचा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरेल आणि ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई करेल.'
हैदराबादच्या लोकांना हुशार संबोधत रेड्डी म्हणाले,'आमचे तेलुगू लोक खूप स्मार्ट आहेत. राजामौलीसारखे आहेत. दिल राजूसारखे आहेत. आणि आमचा नवीन संदीप( अॅनिमल दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा) ही आलाय. आमची हीच लोक पूर्ण हिंदुस्तानात राज्य करतील. हैदराबाद सर्वात वरती असेल. बघा आमची हिरोईनही किती स्मार्ट आहे. पुष्पा मधून तर धमाल उडवली.'
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित Animal 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय. सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरु झालं असून आतापासूनच २ लाखांपेक्षा जास्त तिकीट विक्री झाली आहे. रणबीरच्या करिअरमधील सर्वात जास्त ओपनिंग कलेक्शन करणारा हा सिनेमा असेल असा अंदाज वर्तवला जातोय.