शूटींगदरम्यान अभिनेत्रीला झाली कोरोनाची लागण, कशी सुरु होणार एंटरटेनमेंट इंडस्ट्री?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 10:56 AM2020-07-05T10:56:51+5:302020-07-05T10:58:14+5:30
गेल्या 10 दिवसांपासून पुन्हा शूटींगला सुरुवात झालीय. पण कोरोना व्हायरस टपून बसला असताना हे काम सोपे नाही, हे आता दिसू लागले आहे.
कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे मनोरंजन विश्व ठप्प पडले होते. चित्रपट व मालिकांचे शूटींग रखडले होते. मात्र गेल्या 10 दिवसांपासून पुन्हा शूटींगला सुरुवात झालीय. काही अटी व शर्तींसह शूटींगला परवानगी देण्यात आली होती. पण कोरोना व्हायरस टपून बसला असताना हे काम सोपे नाही, हे आता दिसू लागले आहे. होय, अलीकडे तेलगू मालिकांची अभिनेत्री नव्या स्वामी हिला शूटींगदरम्यान कोरोनाची लागण झाल्याने सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. 1 जुलैला नव्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली.
नव्या आठवड्यापासून एका मालिकेचे शूटींग करत होती. यादरम्यान सर्वोतोपरी काळजी घेतल्यानंतरही तिला कोरोनाची लागणी झाली.
सुरुवातीला तिला थकवा व डोकेदुखी जाणवली. मात्र याऊपरही ती शूटींग करत राहिली. पण प्रकृती आणखी बिघडल्यावर तिची कोरोना टेस्ट करण्यात आली. ती पॉझिटीव्ह आढळली. आपण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समजताच नव्याला रडू कोसळले होते. कोणाच्या संपर्कात आल्याने तिला कोरोना झाला हे मात्र अद्याप समजलेले नाही. यानंतर मात्र घाईघाईत सेटवर परतण्याचा निर्णय घेतला जो चुकीचा होता, हे तिने मान्य केलेय.
शूटींगदरम्यान नव्याला कोरोनाने ग्रासल्याने हिंदी व मराठी सिनेसृष्टीतही खळबळ माजली आहे. विशेषत: मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना कलाकारांचे शूटींगवर परतणे किती सुरक्षित आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारच्या गाइडलाइन्स पाळूनही सेटवर काम करणे सोपे नाही, हे लक्षात आल्याने अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.